मेडिकल विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर विद्यापीठाचा मोठा निर्णय

वैद्यकीय शिक्षणातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या हिवाळी सत्रांच्या परीक्षा आता एक दिवसाआड घेण्यात येणार आहेत.

मेडिकल विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर विद्यापीठाचा मोठा निर्णय

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

वैद्यकीय पदवी (Medical degree) आणि पदव्युत्तर शिक्षणातील (Post Graduate Education) हिवाळी सत्रातील परीक्षांबाबत (Examinations in Winter Session) मोठी बातमी आहे. वैद्यकीय शिक्षणातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या हिवाळी सत्रांच्या परीक्षा आता एक दिवसाआड घेण्यात येणार आहेत. विद्यार्थांशी (students) संवाद साधल्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंनी (By the Vice-Chancellor of the University of Health Sciences, Mumbai)हा निर्णय जाहीर केला आहे.

मागील काही दिवसांपूर्वी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची बैठक झाली होती. त्यात झालेल्या चर्चान्वये विद्यापीठातर्फे हिवाळी सत्र 2024 पासून या परीक्षा एक दिवसाची सुट्टी न देता सलग घेण्याबाबत परिपत्रकही काढण्यात आले होते. विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयाला विद्यार्थी संघटनांनी विरोध केला होता. त्यानंतर आता हा निर्णय बदलण्यात आला आहे.

बदललेल्या निर्णयानुसार, या आधी या परीक्षांमध्ये कोणतीही सुट्टी न घेता सलगपणे पेपर घेण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांच्या शैक्षणिक दिनदर्शिकेनुसार या वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा एका महिन्याच्या आत घेण्यात याव्या, असे निर्देश देण्यात आले होते. आयोगाच्या या निर्णयाला मात्र विद्यार्थ्यांनी विरोध केला होता.

दरम्यान, वैद्यकीय अभ्यासक्रमांची काठीण्य पातळी बघता आणि विद्यार्थ्यांचा मानसिक ताण बघता या परीक्षांमध्ये एक दिवसाआड परीक्षा घेतली जावी,  तशी एक दिवसाची सुट्टी दिली जावी, अशी मागणी वारंवार केली जात होती. याबाबत विद्यार्थ्यांच्या प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने कुलगुरुंनी विद्यार्थ्यांसोबत झूम मिटींगद्वारे संवाद साधला. या दरम्यान एक दिवस आड परीक्षा घेणेबाबत ऑनलाईन मतदान प्रक्रिया (Opinion Poll) राबवली असता बहुसंख्य विद्यार्थ्यांचा कल हा एक दिवस आड परीक्षा घ्यावी असा दिसून आला. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता पूर्वीप्रमाणेच एक दिवस आड परीक्षा घेण्याबाबत सहमती झाली आहे.