रॅप सॉंग प्रकरण पुन्हा प्रकाश झोतात; 17 अधिकारी - कर्मचाऱ्यांना नोटीसा 

विद्यापीठातील प्रमुख अधिकारी व सुरक्षा कर्मचाऱ्यांना रॅप सॉंग प्रकरणात वकिलामार्फत वैयक्तिक नोटीस बजावण्यात आल्याची माहिती विद्यापीठातील विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

रॅप सॉंग प्रकरण पुन्हा प्रकाश झोतात; 17 अधिकारी - कर्मचाऱ्यांना नोटीसा 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University)आवारात चित्रीकरणाला परवानगी दिलेली नसताना एका रॅपरने वादग्रस्त पद्धतीने विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये रॅप सॉंगचे चित्रीकरण (Filming a rap song)केले होते. या प्रकरणाची दखल राज्यपालांसह विधानसभेच्या तत्कालीन विरोधी पक्ष नेत्यांनी घेतली होती. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून हे प्रकरण शांत होते.मात्र विद्यापीठातील प्रमुख अधिकारी व सुरक्षा कर्मचाऱ्यांना (Principal officers and security of the university) रॅप सॉंग प्रकरणात वकिलामार्फत वैयक्तिक नोटीस (Notice through lawyer in rap song case) बजावण्यात आल्याची माहिती विद्यापीठातील विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे रॅप सॉंग प्रकरण पुन्हा एकदा प्रकाश झोतात आले आहे.

पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या सभागृहात व आवारात अश्लील शिव्यांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या प्रकरणाची पोलिसांतर्फे व विद्यापीठ प्रशासनातर्फे चौकशी करण्यात आली. विद्यापीठाची परवानगी न घेता रॅप साँगचे चित्रीकरण केल्याप्रकरणी रॅपर शुभम जाधवसह त्याच्या सहकाऱ्यांविरोधात पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती.पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.तसेच विद्यापीठाने माजी पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती.या समितीने चौकशी अहवाल विद्यापीठाकडे सादर केला होता.त्यानंतर या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर काय कारवाई करावी, यावरही विद्यापीठाने समिती स्थापन केली होती.मात्र, अद्याप कोणावरही कारवाई झाली नाही.त्यामुळे या प्रकरणी 17 अधिकारी व कर्मचारी यांना नोटीस बजावण्यात आली आहे.त्यातील काहींनी ही नोटीस स्वीकारली आहे. 

रॅप साँग प्रकरणाची दाखल राज्यपाल कार्यालयातर्फे घेण्यात आली होती.त्याचप्रमाणे राज्याचे तत्कालीन विरोधी पक्ष नेते व सध्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालक मंत्री अजित पवार यांनी याबाबत विद्यापीठाला पत्र लिहिले होते.परंतु, या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही.त्यात आता रॅप साँग चित्रीकरणाच्या दिवशी कामावर हजर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.