मोठी बातमी : अनाथ आरक्षण धोरणामध्ये सरकारकडून बदल

ठाकरे सरकारच्या काळात अनाथांमध्ये करण्यात आलेले तीन प्रवर्ग बदलून त्याऐवजी आता दोनच प्रवर्ग करण्यात आले आहेत.

मोठी बातमी : अनाथ आरक्षण धोरणामध्ये सरकारकडून बदल
Orphanage Reservation Policy

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य सरकारने अनाथ आरक्षण (Reservation) धोरणामध्ये मोठा बदल केला आहे. ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) काळात अनाथांमध्ये करण्यात आलेले तीन प्रवर्ग बदलून त्याऐवजी आता दोनच प्रवर्ग करण्यात आले आहेत. त्यानुसार या दोन प्रवर्गांना नोकरी आणि शिक्षणात एकूण जागांच्या तुलनेत एक टक्का आरक्षण दिले जाणार आहे. याबाबतचा सविस्तर शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. (Orphanage Reservation Policy)

राज्यात पहिल्यांदाच २०१८ मध्ये अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गातून शिक्षण व नोकरी यामध्ये एक टक्का समांतर आरक्षण लागू करण्यात आले. त्यानंतर ठाकरे सरकारच्या काळात या धोरणात बदल करण्यात आला. अनाथांची तीन प्रकारांमध्ये वर्गवारी करण्यात आली. तसेच अनाथांना दिव्यांगांच्या धर्तीवर एक टक्के आरक्षण लागू करण्यात आले. ऑगस्ट २०२१ मध्ये याबाबतचा शासन आदेश निघाला. तीन प्रकारांमुळे काही जणांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी सरकारकडे येत होत्या. तिसरी वर्गवारी रद्द करण्याची मागणीही होत होती. त्यानुसार सरकारने आता संस्थात्मक आणि संस्थाबाह्य असे दोनच प्रकार केले आहेत.

अनाथांना दिव्यांगांच्या धर्तीवर शिक्षण व शासकीय (निमशासकीय तसेच शासन अनुदानित संस्थांमधील) पद भरतीमध्ये उपलब्ध पदांच्या एक टक्का इतके आरक्षण लागू करण्यात मान्यता देण्यात आली आहे. संस्थात्मक प्रवर्गामध्ये ज्यांच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी त्यांच्या आई वडीलांचे निधन झाले आहे व ज्यांचे शासन मान्यता प्राप्त संस्थांमध्ये पालन पोषण झाले आहे (त्यांच्या नातेवाईकांची अथवा जातीची माहिती उपलब्ध असो किंवा नसो) अशा मुलांचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा : महात्मा गांधी हत्या, 'आरएसएस'वरील बंदी अभ्यासक्रमातून हद्दपार

संस्थाबाह्य या प्रवर्गामध्ये ज्यांच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापुर्वी त्यांच्या आई-वडीलांचे निधन झाले आहे आणि ज्यांचे शासन मान्यताप्राप्त संस्थांबाहेर, नातेवाईकांकडे संगोपन झाले आहे, अशा बालकांचा समावेश आहे. अनाथ आरक्षण प्रवर्गासाठी उपलब्ध जागा समसंख्येत असल्यास संस्थात्मक व संस्थाबाह्य प्रवर्गास समप्रमाणात जागा वाटून देण्यात येतील. जागा विषम संख्येत असल्यास आधी जागांची समप्रमाणात विभागणी केली जाईल. त्यानंतर उरलेले अधिकचे एक पद हे पहिल्या पदभरतीमध्ये संस्थात्मक प्रवर्गासाठी तर त्यापुढील पदभरतीमध्ये विषम जागा उपलब्ध असतील तर उरलेले अधिकचे एक पद संस्थाबाह्य प्रवर्गातील मुलांसाठी आरक्षित असेल.

अशी होती वर्गवारी

ठाकरे सरकारच्या काळात अनाथांची विभागणी तीन वर्गवारीमध्ये करण्यात आली होती. अ प्रवर्गात ज्यांना कोणी नातेवाईक नाहीत अशा पूर्णत: अनाथ असलेल्या बालकांचा समावेश होता. त्यांचा सांभाळ अनाथालयात झाला. ब प्रवर्गामध्ये आई-वडिलांचे निधन झाले असले तरी नातेवाईकांचे माहिती उपलब्ध असून त्यांच्या कागदपत्रावर जातीचा उल्लेख आहे. पण त्या बालकांचा सांभाळ अनाथालयात झाला आहे. तर क प्रवर्गामध्ये ज्या बालकांचे आई-वडील नसले तरी त्यांचे संगोपन नातेवाईकांनी केले आहे. त्यांच्या जातीचीही माहिती आहे. आता या प्रवर्गात बदल करून संस्थात्मक आणि संस्थाबाह्य असे दोनच प्रवर्ग करण्यात आले आहेत.