NEET वरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ 

आज विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG संबंधित कथित अनियमिततेचा मुद्दा उपस्थित करून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

NEET वरून संसदेच्या दोन्ही सभागृहात  गदारोळ 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सध्या संपूर्ण देशात NEET-UG प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. दरम्यान शुक्रवारी संसदेच्या दोन्ही सभागृहातही (LOKSABHA, RAJYASABHA) या मुद्यावरून गदारोळ झाला. काँग्रेस (CONGRESS) आणि 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स' (INDIA) च्या इतर घटक पक्षांनी  संसदेच्या दोन्ही सभागृहात वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG संबंधित कथित अनियमिततेचा मुद्दा उपस्थित करून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पण विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत  (दि. ०१) तहकूब करण्यात आले आहे. 

दरम्यान, संसदेत जाण्यापूर्वी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, "काल सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली आणि आज NEET या विषयावर चर्चा करण्याची गरज आहे, यावर एकमत झाले. आम्हाला वाटले की NEET असावी."  "मी पंतप्रधानांना विनंती करतो की, हा तरुणांचा प्रश्न आहे आणि त्यावर योग्य चर्चा झाली पाहिजे आणि ती आदरयुक्त चर्चा झाली पाहिजे. हा संदेश संसदेतून गेला पाहिजे की, भारत सरकार आणि विरोधी पक्ष एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलत होते. 

त्याचबरोबर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत सांगितले की, "देशातील लाखो विद्यार्थी त्रस्त आहेत. गेल्या 7 वर्षात 70 वेळा पेपर फुटला आहे." राज्यसभा अध्यक्षांनी खरगे यांना नियम २६७ अंतर्गत NEET पेपर लीक प्रकरणावर चर्चा करू दिली नाही. त्यामुळे नीट परीक्षेच्या घोटाळ्यावर पुन्हा काय चर्चा होते. हे पाहावं लागणार आहे.