बोगस शिक्षिका प्रकरणात वरिष्ठ शिक्षण अधिकारी अडकणार?

कारवाईमध्ये संगीता दत्तात्रय झुरंगे (Sangeeta Zurange) या बोगस शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बोगस शिक्षिका प्रकरणात वरिष्ठ शिक्षण अधिकारी अडकणार?
Pune Zila Parishad

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

बनावट कागदपत्रे सादर करून तब्बल १६ वर्ष शिक्षण विभागाची (Education Department) फसवणूक करणाऱ्या महिला शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकंद पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये संगीता दत्तात्रय झुरंगे (Sangeeta Zurange) या बोगस शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे. मात्र आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी वरिष्ठ शिक्षण अधिकाऱी अकडले जाऊ शकतात, अशी चर्चा शिक्षण वर्तुळात आहे. (Sangeeta Zurange who became a teacher on the basis of bogus documents was arrested)

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा http://eduvarta.com/

मिळालेल्या माहितीनुसार, संगीता दत्तात्रय झुरंगे या महिलेने लोणीकंद येथील झेडपी शाळेत नोकरी मिळवण्यासाठी तिच्या बहिणीच्या बारावीच्या गुणपत्रिकेचा वापर केला. त्या गुणपत्रिकेच्या आधारे तिला झेडपीच्या शाळेत (ZP School) उपशिक्षिका म्हणून नोकरी मिळाली. तिनेच सरकारी गॅझेट, आधार आणि पॅन कार्डमध्ये आपले नाव बदलले. संगीता झुंगारे हिला तिच्या १६ वर्षांच्या नोकरीत जिल्हा प्रशासनाकडून सुमारे ४० लाख रुपये पगार देण्यात आला होता. ही रक्कम वसूल करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पाऊले उचलण्यात आली आहेत. 

दरम्यान, १२ सप्टेंबर २०२२ मध्ये आरोपीच्या कुटुंबीयांनी या संदर्भात शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. तक्रार आल्यानंतर विभागाने चौकशी सुरू केली असता कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर झेडपीचे विस्तार अधिकारी (शिक्षण) किसन भुजबळ यांनी लोणीकंद पोलिसात तक्रार दाखल केली. संगीता झुरंगे हिच्या विरोधात भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८ आणि ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेमध्ये नोकरी मिळविताना संबंधित महिलेने दिलेली कागदपत्रे बनावट असल्याचे शिक्षण विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या लक्षात कसे आले नाही, अशी चर्चा सुरू आहे. कागदपत्रांची पडताळणी करताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले की जाणीवपूर्वक कागदपत्रे बनावट असल्याचे माहिती असूनही त्यावर आक्षेप घेतला नाही, हे आता पोलिसांच्या पुढील तपासात निष्पन्न होईल. पण त्याआधीच या प्रकरणात काही अधिकारी अडकू शकतात, अशी जोरदार चर्चा रंगली आहे.