आधी बदल्या अवघड क्षेत्रातील, नंतरच होणार शिक्षक भरती; दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण

समितीच्यावतीने नुकतीच केसरकर यांची विविध मागण्यांसंदर्भात भेट घेण्यात आली. या भेटीत झालेल्या चर्चेची माहिती राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

आधी बदल्या अवघड क्षेत्रातील, नंतरच होणार शिक्षक भरती; दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण
Education Minister Deepak Kesarkar

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यात शिक्षक भरतीची (Teachers Recruitment) जोरदार चर्चा सुरू असताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. आधी राज्यातील अवघड क्षेत्रातील प्राथमिक शिक्षकांच्या (Primary Education) सोयीनुसार बदल्या केल्या जातील. त्यानंतर बदल्या थांबवून शिक्षक भरती केली जाईल, असे आश्वासन केसरकर यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीला दिले आहे.

समितीच्यावतीने नुकतीच केसरकर यांची विविध मागण्यांसंदर्भात भेट घेण्यात आली. या भेटीत झालेल्या चर्चेची माहिती राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली. कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नारायण नाईक, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, सावंतवाडी कार्याध्यक्ष गोविंद शेर्लेकर उपस्थित होते.

होय, आम्ही MPSC कर! सुशील काटकरांचा वडापावची गाडी ते हॉटेलपर्यंतचा प्रवास व्हाया MPSC...

शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत लवकरच प्राथमिक शिक्षक समिती शिष्टमंडळ व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष बैठक आयोजनाबाबत मंत्री केसरकर यांनी आश्वस्त केल्याची माहिती कोरगावकर यांनी दिली. मागण्यांबाबत पुढील आठवड्यात प्राथमिक शिक्षक समिती राज्य शाखेकडून मंत्रालयीन स्तरावर योग्य तो पाठपुरावा करण्यात येईल, असेही राज्य कोरगावकर यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यातील रिक्त असलेली केंद्रप्रमुख पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असून या परीक्षेसाठी ५० वर्षे वयाची अट रद्द करून ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात यावी, जिल्हांतर्गत ऑनलाईन बदलीतील अन्यायकारक टप्पा क्र. ६ रद्द करावा, सातव्या वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा फरकाचा हप्ता मिळावा, तीन वर्षांपासूनचे थकित वेतनेतर अनुदान मिळावे, वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणाची नोंदणी करताना ज्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या असून राज्यातील बदली झालेल्या जिल्ह्यात शिक्षक मेमध्येच हजर झाले, परंतु त्यांना शाळा न दिल्याने संबंधित शिक्षकांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाहीत, याबाबत ऑनलाईन फॉर्ममधील त्रुटी दूर कराव्यात, आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत.

जेएनयु मधील 'स्कूल' ला द्यायचे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ; राज्य शासनाकडून मिळेना प्रतिसाद

२०१९ च्या पवित्र पोर्टलद्वारे राज्यात भरती केलेल्या विज्ञान गणित विषय पदवीधर शिक्षकांना शिक्षणसेवक कालावधी पूर्ण झाल्यानंतर अन्यायकारक उपशिक्षकाची वेतन श्रेणी लागू करण्यात आली; परंतु या शिक्षकांची नेमणूक विषय पदवीधर म्हणून केली असल्याने या शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी मंजूर करण्याबाबत नेमलेल्या अभ्यास समितीचा अहवाल सादर केल्यानंतर तातडीने पदवीधर वेतन श्रेणी मंजूर करण्याची मागणीही समितीकडून केसरकर यांच्याकडे करण्यात आली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo