जेएनयु मधील 'स्कूल' ला द्यायचे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ; राज्य शासनाकडून मिळेना प्रतिसाद

जेएनयु मध्ये 'स्कूल ऑफ नॅशनल सिक्युरिटी स्टडीज' हे संशोधन केंद्र असून या केंद्राला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्यावे, यासाठी काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत.

जेएनयु मधील 'स्कूल' ला द्यायचे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ; राज्य शासनाकडून मिळेना प्रतिसाद

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क


जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) 'स्कूल ऑफ नॅशनल सिक्युरिटी स्टडीज'ला छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे नाव द्यावे, यासंदर्भात एकदा नाही तर दहा वेळा महाराष्ट्र शासनाशी (Maharashtra Government) पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्यास कोणताही प्रतिसाद मिळाला नाही,  अशी खंत जेएनयु विद्यापीठाच्या कुलगुरू (Vice Chancellor) डॉ. शांतीश्री पंडित (Santishree Dhulipudi Pandit) यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : UGC NET 2023 : यूजीसी नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १३ ते १७ जूनदरम्यान आयोजन

     पुणे एज्युकेशन फोरमच्या माध्यमातून दिल्ली येथील शैक्षणिक संस्थांना पुण्यातील पत्रकारांनी भेटी दिल्या. यानिमित्ताने डॉ. शांतीश्री पंडित पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, जेएनयू मध्ये विविध भाषांचा अभ्यास करणारी केंद्र आहेत. तसेच 'स्कूल ऑफ नॅशनल सिक्युरिटी स्टडीज' हे संशोधन केंद्र सुध्दा आहे. या केंद्राला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्यावे, यासाठी काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. पण, राज्य शासनाकडून त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. 


      जेएनयूमधील मराठी भाषा अभ्यासासाठी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दीड कोटी रुपये निधी दिला होता. मराठा साम्राज्याचा इतिहास दैदिप्यमान आहे. त्यावर अधिक संशोधन करता येऊ शकते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या साम्राज्यात कान्होजी आंग्रे यांच्यासह अनेक पराक्रमी शूरवीर योद्धा होऊन गेले. या सर्वांचा अभ्यास स्कूल ऑफ नॅशनल सिक्युरिटी स्टडीज येथे व्हावा, असे मला मनापासून वाटते. तसेच महाराष्ट्र शासनाने यात विलंब करू नये. देशातील इतर राज्य या स्कूलला आपल्या राज्यातील थोर पुरुषाचे नाव दिले जावे , यासाठी प्रयत्नशील आहेत, असेही डॉ. शांतीश्री पंडित यांनी सांगितले.