उच्च शिक्षण सहसंचालकांवर प्राध्यापक संघटनेच्या अध्यक्षांनी टाकला दबाव ? ; पोलिसांकडे लेखी तक्रार

तुम्ही माझ्या राज्यशास्त्र विषयाच्या उमेदवाराची सदर संस्थेत निवड करा, अन्यथा मी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करेल अशी भाषा पाथ्रीकर यांनी वापरली असल्याचे किरणकुमार बोंदर यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.

उच्च शिक्षण सहसंचालकांवर प्राध्यापक संघटनेच्या अध्यक्षांनी टाकला  दबाव ? ; पोलिसांकडे लेखी तक्रार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

प्राध्यापक भरती प्रक्रियेत नवप्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष संदीप पाथ्रीकर यांनी माझ्या परिचयाच्या उमेदवाराची नियुक्ती करावी, असा दबाव माझ्यावर टाकला, अशी लेखी तक्रार पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक किरणकुमार बोंदर यांनी बंड गार्डन पोलीस स्टेशन येथे दिली आहे.

अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण प्रसारक समाज या संस्थेच्या ५ अनुदानित महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार ७, ८ व ९ जुलै या कालावधीत मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. विषय तज्ञांमार्फत देण्यात आलेल्या गुणांच्या आधारेच तयार करण्यात आलेली गुणवत्ता यादी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आली. मी या मुलाखतीच्या प्रक्रियेमध्ये काम करत असल्याने, त्यात व्यस्त होतो.याच कालावधी या व्यक्तीने मला व्हाट्सअप कॉल केला होता, असे किरणकुमार बोंदर यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

हेही वाचा : प्राध्यापक भरती : तीन दिवसांत २ हजार ९०० जणांच्या मुलाखती घेतल्याचा धक्कादायक प्रकार   

नवप्राध्यापक संघटनेचे संदीप पाथ्रीकर यांना मी १० जुलै रोजी कॉलबॅक केला असता त्यांनी "संघटनेत काम करत असलेल्या कार्यकर्त्याची पदभरतीमध्ये निवड करण्याबाबत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच पदभरती प्रक्रियेत राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर यांच्या कार्यालयात जाऊन सुध्दा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तुम्ही माझ्या राज्यशास्त्र विषयाच्या उमेदवाराची सदर संस्थेत निवड करा, अन्यथा मी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करेल, अशी भाषा वापरली", असेही बोंदर यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.
------------
" प्राध्यापक भरतीसाठी मुलाखतीचे नियोजन करण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालय व्यवस्थापनाची असते. मुलाखतीसाठी मला वेळ दिला नाही, अशी एकही तक्रार उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे प्राप्त झाली नाही. भरती प्रक्रियेसाठी शासकीय प्रतिनिधीला आमंत्रित केलेले असते. निवड प्रक्रियेत संस्था प्रतिनिधीसह विद्यापीठाचे सुध्दा प्रतिनिधी असतात. संबंधित संघटनेच्या अध्यक्षाने माझ्या परिचयाच्या उमेदवाराची निवड करावी, असा दबाव माझ्यावर टाकला होता. निवड केली नाही तर तुमची तक्रार करेल, असे त्याने सांगितले होते. त्यामुळे मी स्वतः संबंधित संघटनेच्या अध्यक्षा विरोधात बंड गार्डन पोलिसांकडे तक्रार दिली आहे."
- किरणकुमार बोंदर, सहसंचालक, उच्च शिक्षण, पुणे विभाग
------------
"माझ्या परिचयाचा उमेदवार प्राध्यापक भरतीसाठी निवडावा, अशा प्रकारचा कोणतीही दबाव मी किरणकुमार बोंदर यांच्यावर टाकला नाही. तसेच पोलीस तक्रारीबाबत मला कोणतीही माहिती मिळालेली नाही."
- संदीप पाथ्रीकर, अध्यक्ष, नवप्राध्यापक संघटना