अन्न ,वस्त्र ,निवारा व इंटरनेट मोफत मिळाले तरच देशाचा विकास : डॉ .रघुनाथ माशेलकर 

जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द आणि चिकाटी ही अतिशय महत्त्वाची आहे .त्यासाठी माशेलकर यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी पंचसूत्री सांगितली.

अन्न ,वस्त्र ,निवारा व इंटरनेट मोफत मिळाले तरच  देशाचा विकास : डॉ .रघुनाथ माशेलकर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

भारत देशात शेतकरी , गरीब ,कष्टकरी व झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक मोठ्या प्रमाणात आहेत .त्यामुळे देशातील उपेक्षित घटकाला अन्न ,वस्त्र ,निवारा व इंटरनेट मोफत मिळाले तरच भारत देशाचा विकास अधिक गतीने होईल, असे मत जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले .

 चैतन्य ग्रुप ने पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे  दहावी ,बारावी व शालेय विद्यार्थ्याना मोफत करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते. त्यावेळी माशेलकर बोलत होते. कार्यक्रमास बार्टीचे महासंचालक सुनिल वारे ,बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार ,सी डॅकचे वरिष्ठ संचालक वसंत अवघडे,माजी पोलीस अधिक्षक के. डी.  मिसाळ ,जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता पुंडलिक थोटवे ,नायडू रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुधीर पाटसुते, पुणे महापालिका सहाय्यक आयुक्त प्रविण आव्हाड ,महेंद्र तूपसौदर ,विठ्ठल सोनवणे उपस्थित होते.
  माशेलकर म्हणाले , केवळ शिक्षण महत्त्वाचे नसून त्यापुढे संधी निर्माण करण्याची व्यवस्था असणे गरजेचे आहे .आपण बारा वर्षांचे होईपर्यत परिस्थिती मुळे चप्पल घालू शकलो नाही. आईच्या अपेक्षेने व जिद्द आणि चिकाटीमुळे आज इथपर्यंत आलो . त्यामुळे जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द आणि चिकाटी ही अतिशय महत्त्वाची आहे .विद्यार्थ्यांना त्यांनी यशस्वी होण्यासाठी पंचसूत्री सांगितली ,आशा आणि अपेक्षा उच्च ठेवा ,प्रचंड मेहनत घ्या,आपल्यासाठी आपणच स्वतःची नवीन दारे (रस्ते) निर्माण करा , चिकाटी अंगी बाळगा ,यशाची आणि उत्तमतेची शिडी चढताना त्याला मर्यादा ठेऊ नका,  चालत रहा या पंचसूत्री त्यांनी यावेळी सांगितल्या .
                   दुसऱ्या सत्रात एमकेसीएल चे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत यांनी दहावी ,बारावी नंतर उपलब्ध असणाऱ्या विविध संधी व योजनांची माहिती दिली . आदर्श गाव कार्यक्रमचे संचालक पोपटराव पवार यांनी शेतीसह इतर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी कसे होता येईल यावर आपले विचार व्यक्त केले .त्यानंतर बिव्हीजी ग्रुपचे संस्थापक हनुमंत गायकवाड यांनी उद्योग आणि व्यवसायमध्ये कशी प्रगती करायची याबाबत गुरुकिल्ली दिली.