शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेकरीता अर्ज करण्याचे आवाहन

बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय व्यवस्थापन इत्यादी उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेकरीता अर्ज करण्याचे आवाहन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबवली जात असून या योजनेच्या लाभासाठी  इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी www.msobcfdc.org  या संकेतस्थळावरून ऑनलाईन कर्ज मागणी अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक  धमेंद्र काकडे यांनी केले आहे.

 शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी परदेशात उच्च व व्यावसायिक शिक्षण घेणारे इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी पात्र आहेत. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय व्यवस्थापन इत्यादी उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेत संपूर्ण कर्ज संबंधित बँकेचे राहणार आहे.विद्यार्थ्याने बँकेच्या कर्जाची परतफेड नियमितपणे केल्यास कमाल १२ टक्के पर्यतची व्याज परतावा रक्कम दर महिन्याला महामंडळ लाभार्थीच्या बँक खात्यावर जमा करणार आहे. अर्ज भरतांना संकेतस्थळावर शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना या  पर्यायाची निवड करुन कर्ज मागणी अर्ज भरावा.तसेच अर्जासोबत मूळ कागदपत्रे अपलोड करावीत. 
 अधिक माहितीसाठी महामंडळाचे जिल्हा कार्यालय महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ,विश्रांतवाडी येथे संपर्क करावा, असे आवाहन धमेंद्र काकडे यांनी केले आहे.