पाचवी ,आठवीच्या वार्षिक परीक्षांवर तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया

केंद्र शासनाने कायद्यात सुधारणा केल्या असतील आणि परीक्षा पद्धतीत बदल होणार असेल तर हा निर्णय घेण्यास काही हरकत नाही.

पाचवी ,आठवीच्या  वार्षिक परीक्षांवर तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षण हक्क कायद्यात (RTE)  राज्य शासनाने सुधारणा केली.तसेच इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा (class five and eight annual examination) घेण्याचा मोठा निर्णय घेतला .त्यामुळे  या पुढील काळात विद्यार्थी पाचवी व आठवीमध्ये अनुउत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्याला  त्याच वर्गात ठेवले जाणार आहे. मात्र," केंद्र शासनाने कायद्यात सुधारणा केल्या असतील आणि परीक्षा पद्धतीत बदल होणार असेल तर हा निर्णय घेण्यास काही हरकत नाही. तसेच  समाजाच्या मागणीनुसार विद्यार्थ्यांची क्षमता तपासण्यासाठी या परीक्षांची आवश्यकता होती " , आशा प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञाकडून व्यक्त केल्या जात आहेत. 
     शिक्षण हक्क कायद्यात सातत्यापूर्ण  सर्वंकष मूल्यमापन पद्धतीला  प्राधान्य दिले होते.त्यानुसार विद्यार्थ्यांची वर्षभरात विविध पद्धतीने तयारी करून घेणे अपेक्षित होते. मात्र, या पद्धतीची अंबलबाजावणी करण्यात ब-याच प्रमाणात अपयश आले. त्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायला हवी, अशी मागणी समोर आली. त्यावर राज्यशासनाने अभ्यास करून या संदर्भात राजपत्र प्रसिध्द केले. त्यानुसार आता इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. राज्याच्या शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे या संदर्भातील कार्यपद्धती निश्चित करण्यात आले आहे. वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेतली जाईल. संबंधित विद्यार्थी या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुन्हा त्याच वर्गात ठेवले जाईल, असा निर्णय शासनाने घेतला आहे. 
  
------------

 
 " दैनंदिन जीवनाशी शिक्षणाचा संबंध जोडला गेला पाहिजे.तसेच अनुभवातून मिळालेल्या शिक्षाणावर आधारित परीक्षा घ्यायला हवी.घोकमपट्टीवर परीक्षा घेणे योग्य नाही.आपल्या शिक्षण पध्दतीत बदल होणे अपेक्षित आहेत.त्यात वेळ पैसा खर्च होत आहे.हे विसरून चालणार नाही. " 
-डॉ. वसंत काळापांडे ,  जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ व बालभारतीचे माजी संचालक   
----------------------
 " केंद्रीय आरटीई कायद्यात विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण झाल्यास त्याच वर्गात ठेवण्याबाबत बदल केला असेल तरच राज्य शासनाला तसा बदल करून त्यानुसार अंमलबजावणी करता येईल.तसे झाले नसेल तर हा निर्णय घेणे गैर आहे.आरटीई कायद्यात परीक्षा घेण्यास कोणतीही बंधने नव्हती.पण सार्वत्रिक परीक्षा घेऊ नये असे नमूद केले होते." 
- एन.के.जरंग, माजी शिक्षण संचालक , महाराष्ट्र राज्य 
--------------------------------------
 "आरटीईमध्ये संतात्यापूर्ण सर्वंकष मूल्यमान पध्दतीचा अवलंब करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार विद्यार्थी उत्तीर्ण होईल एवढी तयारी करून घेणे अपेक्षित होते.मात्र, संतात्यापूर्ण सर्वंकष मूल्यमान पध्दतीचा अवलंब करण्यात आपण अयशस्वी ठरलो.त्यामुळे अपरिपक्व विद्यार्थी पुढे गेले.आता अभ्यासात मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांची पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे.समाजाकडूनही विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी,अशी मागणी केली जात होती."
- डॉ. अ.ल.देशमुख ,  जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ