शिक्षक भरती : पवित्र पोर्टलवर असा भरा अर्ज, महत्वाचे दहा मुद्दे वाचा...

राज्यभरात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून टेट परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे भरती केली जाणार आहे. त्यासाठी नवीन पोर्टल शुक्रवारपासून सुरू करण्यात आले आहे.

शिक्षक भरती : पवित्र पोर्टलवर असा भरा अर्ज, महत्वाचे दहा मुद्दे वाचा...
Teachers Recruitment

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शालेय शिक्षण विभागाकडून (School Education Department) बहुप्रतिक्षित शिक्षक भरती (Teachers Recruitment) प्रकिया एक सप्टेंबरपासून सुरू केली आहे. उमेदवारांना पवित्र पोर्टलच्या (Pavitra portal) माध्यमातून नोंदणी व स्व-प्रमाणपत्र भरता येणार आहे. जवळपास २ लाख १६ हजारांहून अधिक उमेदवार त्यासाठी पात्र आहेत. पण अर्ज भरताना झालेली एक चुकही महागात पडू शकते. त्यामुळे शिक्षण विभागाकडून अर्ज कसा भरावा, त्यासाठी कोणती दक्षता घ्यावी याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.

राज्यभरात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून टेट परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे भरती केली जाणार आहे. त्यासाठी नवीन पोर्टल शुक्रवारपासून सुरू करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांना https://mahateacherrecruitment.org.in/ या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी केल्याशिवाय भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. नोंदणीनंतर स्व-प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्यक माहिती भरावी लागेल. त्यामध्ये भरलेली सर्व माहिती उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे असायला हवी. अन्यथा उमेदवारांची नियुक्ती कोणत्याही टप्प्यावर रद्द होऊ शकते.

असा भरा अर्ज

१. उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्रामध्ये माहिती नमूद करण्यापूर्वी स्वत:ची नोंदणी (Registration) करणे आवश्यक आहे. ही नोंदणी (Registration) करण्यासाठी Register Here येथे क्लिक करून तेथे आपला टेट २०२२ चाचणीचा रोल नंबर व रजिस्ट्रेशन क्रमांक नोंद करावा. त्यानंतर उमेदवारांनी स्वतःचा पासवर्ड तयार करावा. उमेदवारांचा टेट २०२२ चा रोल नंबर हाच त्यांचा लॉग इन आयडी (log in ID) असेल

Breaking news: अखेर शिक्षक भरतीला मुहूर्त लागला; पवित्र प्रणाली संकेतस्थळ सुरू

२. पवित्र पोर्टल वरील नोंदणी (Registration) व स्व-प्रमाणपत्र (Self certification) भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने स्वतः करणे आवश्यक आहे.

 

३. अर्ज मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असला तरी उमेदवाराने नोंदणी (Registration) व स्व प्रमाणपत्र (Self certification) साठी आवश्यक माहिती इंग्रजीमध्ये capital letters मध्ये भरावी. संक्षिप्त (Abbrivations) अथवा आद्याक्षरे (Initials) न देता संपूर्ण नाव व संपूर्ण पत्ता नमूद करावा. उमेदवाराने स्वतःचे नाव, वडिलांचे / पतीचे नाव, आडनाव यामध्ये एक स्पेस सोडावी तसेच पत्ता लिहिताना इमारतीचे नाव, रस्त्याचे नाव इत्यादीमध्ये एक स्पेस सोडावी.

 

४. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेसंदर्भात स्व-प्रमाणपत्रामध्ये आवश्यक असलेली माहिती दिलेल्या क्रमाने नमूद करावी. संबंधित परीक्षेच्या गुणपत्रकावरील दिनांक हा ती शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केल्याचा दिनांक मानण्यात येईल.

 

५. संबंधित शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेच्या सर्व परीक्षा विहित दिनांकापूर्वी म्हणजेच दिनांक १२/२/२०२३ अखेरपर्यंत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तथापि CTET-December २०२२ ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची सदर अर्हता विचारात घेतली जाईल.

 

६. ज्या उमेदवाराचा निकाल कोणत्याही कारणांमुळे राखून ठेवला असेल आणि असा राखून ठेवलेला निकाल दि. १२/०२/२०२३ नंतर जाहीर झाला असेल अशावेळी उमेदवाराने विहित मुदतीत अर्हता धारण केली असे मानण्यात येणार नाही.

 

७. उमेदवाराने पत्र व्यवहाराचा स्वत:चा पत्ता इंग्रजीमध्ये अचूक नमूद करावा.

 

८. उमेदवाराचे वय, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, आरक्षित प्रवर्ग (असल्यास), उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र, दिव्यांग व्यक्ती, महिला, माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू तसेच अनाथ इत्यादी संदर्भात न चुकता निःसंदिग्धपणे / निर्विवादपणे दावा करणे आवश्यक आहे. अर्जातील संबंधित रकान्यात स्पष्टपणे दावा केला नसल्यास संबंधित दाव्याचा विचार केला जाणार नाही. तसेच उमेदवार एकापेक्षा जास्त दावे करू इच्छित असल्यास तसे स्पष्टपणे स्व प्रमाणपत्रामध्ये नमूद करावे.

 

९. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी- २०२२ यासाठी ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने प्रवर्ग व समांतर आरक्षण इत्यादी बाबी नमूद केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे कडील सदर चाचणीची सुधारित अधिसूचना दिनांक ७/२/२०२३ अन्वये उमेदवाराकडे आवश्यक कागदपत्र प्राप्त करण्यासाठी दिनांक ३१/३/२०२३ अखेरपर्यंत दिलेली मुदतवाढ लक्षात घेता उमेदवारास सद्य:स्थितीत कागदपत्रे प्राप्त असल्यास प्रवर्ग व समांतर आरक्षण विषयक बदल करता येतील. ज्या उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी- २०२२ च्या वेळी अर्जामध्ये दिव्यांगत्वाचा दावा केला आहे, अशा उमेदवारांना त्यांच्या दिव्यांगत्वाचा दाव्यामध्ये कोणत्याही कारणास्तव बदल करता येणार नाही.

१०. आरक्षित प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवाराकडे (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, खुल्या प्रवर्गातील महिला वगळून) उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (Non creamy layer) प्राप्त असणे आवश्यक आहे. आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवाराकडे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. या प्रवर्गातील उमेदवारांकडे सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j