पद एकच पात्रता वेगळी; आरोग्य सेवक पदभरतीबाबत उमेदवारांमध्ये नाराजी

महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आरोग्य सेवकांच्या पात्रतेबाबत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना निवेदन देत पात्रता बदलण्याची मागणी केली आहे.

पद एकच पात्रता वेगळी; आरोग्य सेवक पदभरतीबाबत उमेदवारांमध्ये नाराजी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सार्वजनिक आरोग्य विभागाकडून (Public Health Department) पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये आरोग्य सेवकांची पदेही भरण्यात येणार आहेत. मात्र, या पदासाठी पुर्वीची इयत्ता दहावी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता बदलण्यात आल्याने इच्छूकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे याच पदासाठी जिल्हा परिषदेच्या पदभरतीत (ZP Recruitment) दहावी हीच पात्रता निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे एकाच पदासाठी शासनाच्या दोन विभागांकडून वेगवेगळी पात्रता कशी असू शकते, असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Maharashtra Government Recruitment)

महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आरोग्य सेवकांच्या पात्रतेबाबत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना निवेदन देत पात्रता बदलण्याची मागणी केली आहे. जाहिरातीत अनेक पदांची अर्हता बदलण्यात आली आहे. त्यापैकी बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) या पदासाठी बारावी (विज्ञान) उत्तीर्णसह सैनिटरी इन्स्पेक्टर किंवा निमवैद्यकिय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम अशी पात्रता आहे. पुर्वी ही पात्रता इयत्ता दहावी उत्तीर्ण (विज्ञान विषयासह) ही होती.

दि. २९ सप्टेंबर २०२१ रोजी आरोग्य विभागाने अधिसूचना काढून क्षणिक पात्रतेत बदल केला होता. त्यावेळीही मोठा विरोध झाला होता आणि अनेक संघटनांनी नव्या शैक्षणिक पात्रतेला विरोध दर्शविला होता. पण आरोग्य विभागाने आतापर्यंत कोणताही बदल केला नाही. २०१९ साली विभागाचे काढलेल्या जाहिरातीत बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी पदासाठी फक्त विज्ञान विषयासह दहावी उत्तीर्ण अशी पात्रता होती.

शिक्षक भरती : पवित्र पोर्टलवर असा भरा अर्ज, महत्वाचे दहा मुद्दे वाचा...

२०२१ जागा कपात होऊन अर्ध्या झाल्याने त्यानंतर निघालेल्या आरोग्य पदभरती जाहिरातीत बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी पदांसाठी एकही जागा नव्हती त्यामुळे दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्जच करू शकले नव्हते. म्हणजे त्यातील बहुतांश जागांवर आजही दहावी उत्तीर्ण उमेदवारांचा हक्क आहे पण अचानक आपण पात्रता बदलल्याने त्यांना अर्जच करता येणार नाही, समनव्य समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील पदभरतीचे उदाहरण द्यायचे झाल्यास आरोग्य सेवक (पुरुष)- ४०% आणि आरोग्य सेवक ५०% (पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी) या दोन पदांसाठी फक्त दहावी उत्तीर्ण पात्रता आहे तर आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा १२ महिन्यांचा मूलभूत पाठ्यक्रम निवड झाल्यानंतर करण्याची मुभा देण्यात आली. आहे तसेच आरोग्य सेवक ५०% पदासाठी हंगामी फवारणी कर्मचारी पदाचा ९० दिवसाच्या अनुभवाची अट शिथिल करून सामान्य उमेदवारांनाही संधी देण्यात आली आहे.

ग्रामविकास विभागाने सर्वसाधारण दहावी/बारावी झालेले उमेदवार अर्ज करू शकतील असे उपाय केल्याने अनेक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. आरोग्य विभागाने अधिसूचना काढून स्वच्छता निरीक्षक सारख्या अभ्यासक्रमाच्या जाचक अटी घातल्याने दहावी, बारावी झालेल्या उमेदवारांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. या परिस्थितीत बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी पदाची शैक्षणिक पात्रता किमान बारावी उत्तीर्ण इतकीच करावी, अशी मागणी समितीने सावंत यांच्याकडे केली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j