breaking news: अखेर शिक्षक भरतीला मुहूर्त लागला; पवित्र प्रणाली संकेतस्थळ सुरू

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने पवित्र पोर्टल या संकेतस्थळाचे अनावरण करून शिक्षक भरातीचा शुभारंभ करण्यात आला.

breaking news: अखेर शिक्षक भरतीला मुहूर्त लागला; पवित्र प्रणाली संकेतस्थळ सुरू
Teachers Recruitment

एज्युवार्ता न्यूज् नेटवर्क 

 शिक्षक भरतीसाठी (Teacher Recruitment) बहुप्रतिक्षित पवित्र प्रणालीचे संकेतस्थळ (Pavitra Portal) सुरू झाले आहे. त्यामुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे.परिणामी शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणा-या उमेदवारांची प्रतीक्षा खेर संपली आहे.लवकरच अनेकांचे शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. 
  राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने पवित्र पोर्टल या संकेतस्थळाचे अनावरण करून शिक्षक भरतीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रनजीतसिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे व अन्य वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा : शिक्षण मोठी बातमी : राज्य शिक्षक पुरस्कारांची घोषणा, १०८ जणांची नावे पाहा एका क्लिकवर


 महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक / शिक्षक पद भरतीसाठी "शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२” ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीमध्ये घेण्यात आलेल्या चाचणीस २ लाख ३९ हजार ७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख  १६ हजार ४४३ उमेदवार प्रत्यक्ष चाचणीसाठी उपस्थित होते.शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील शिक्षण सेवक / शिक्षक या रिक्त पदांची भरती गुणवत्तेनुसार करण्यात येत आहे.


शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - २०२२ साठी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना पवित्र पोर्टलवर पदभरतीच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी त्यांचे स्व प्रमाणपत्रात आवश्यक माहिती नमूद करण्याची सुविधा आजपासून (दि.१ सप्टेंबर २०२३) देण्यात आली आहे.त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या जाहिराती मुलाखतीशिवाय या प्रकारातील असतील.तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील असतील.


उमेदवाराची अर्हता विचारात घेऊन जाहिरातीतील आरक्षण, गट व विषय याचा एकत्रित विचार करून उमेदवारांनी दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार व गुणवत्तेनुसार नियुक्तीबाबतची शिफारस करण्यात येणार आहे.सर्वसाधारण गुणवत्ता 'यादी (General Merit List) पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केल्यानंतर सबंधित व्यवस्थापन उमेदवारांची कागदपत्र तपासून नियुक्ती आदेश देण्याबाबतची आवश्यक कार्यवाही करतील.
----------------------
"राज्याच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी दर्जेदार व गुणवत्तापुर्ण शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. नजिकच्या काळात नवीन शिक्षण धोरणाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात येईल."

-  दिपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य
-------------------------

ज्यांचे शिक्षक होण्याचे दीर्घकाळचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे, अशा सर्व अभियोग्यता धारकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा.विविध संघटना आणि गटांनी विविध मागण्या मांडल्या होत्या आणि त्यातील काही विरोधाभासी होत्या.आम्ही विवादांचे समाधानकारक निराकरण केले आहे आणि तार्किकदृष्ट्या सुसंगत धोरण तयार केले आहे.TAIT त्रुटीमुक्त पद्धतीने पार पडली आणि मला खात्री आहे की पोर्टलद्वारे ही भरती प्रक्रिया देखील त्या मापदंडानुसार होईल .

- सूरज मांढरे, शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य