रॅप सॉंग प्रकरणी विद्यापीठाकडून उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन

माजी पोलीस महासंचालक डॉ.जयंत उमराणीकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.एका महिन्याच्या आत समितीने अहवाल सादर करावा, अशा सूचना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी दिल्या आहेत.                        

रॅप सॉंग प्रकरणी विद्यापीठाकडून उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क / पुणे 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) मुख्य इमारतीच्या आवारात चित्रित केलेल्या वादग्रस्त रॅप सॉंग (rap song) प्रकरणाची विद्यापीठ पातळीवर चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची (High Level Inquiry Committee) स्थापना करण्यात आली आहे. या समितीने एका महिन्याच्या आत अहवाल सादर करावा, अशा सूचना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी दिल्या आहेत.                        

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या आवारात तसेच इमारतीमधील विविध सभागृहांमध्ये वादग्रस्त रॅप सॉंगचे चित्रीकरण करण्यात आले असल्याचे वृत्त सर्वप्रथम 'एज्युवार्ता'ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर आता विद्यापीठाने संबंधित घटनेची चौकशी करण्यासाठी माजी पोलीस महासंचालक डॉ.जयंत उमराणीकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य बागेश्री मंठाळकर ,आधिसभा सदस्य प्रसेनजीत फडणवीस, प्रतिष्ठित प्राध्यापक निवृत्त कॅप्टन चंद्रशेखर चितळे, आजीवन अध्ययन व विस्तार केंद्राचे संचालक डॉ. विलास आढाव आणि उपकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे यांचा समावेश केला आहे.    

        विद्यापीठाच्या आवारात तसेच सभागृहात मद्याची बाटली, तलवार आणि पिस्तूल घेऊन काही तरुणांनी रॅप सॉंगचे चित्रकरण केल्याचे समोर आले होते. या प्रकरणी विद्यापीठाने पोलिसांकडे तक्रार दिली असून पोलिसांनी संबंधित तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे.