धक्कादायक : मागील पाच वर्षात २५ विद्यार्थ्यांची रॅगिंग मुळे आत्महत्या

माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी १ जानेवारी २०१८ ते १ ऑगस्ट २०२३ या कालावधीत रॅगिंगमुळे विद्यार्थ्यांच्या झालेल्या आत्महत्या ही आकडेवारी युजीसीकडे मागितली होती.

धक्कादायक : मागील पाच वर्षात २५ विद्यार्थ्यांची रॅगिंग मुळे आत्महत्या
Ragging in Colleges

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

विद्यापीठ अनुदान आयोगा (UGC) ने  १२ ते १८ ऑगस्ट हा आठवडा 'अँटी रॅगिंग वीक' (Anti Ragging Week) म्हणून घोषित केला होता. या पार्श्वभूमीवर UGC कडून आणि देशातील विद्यापीठे, महाविद्यालयांकडून रॅगिंग म्हणजे काय, त्याविरोधी कायदे आदींविषयी जनजागृती करण्यात आली होती. आता रॅगिंग विषयी UGC कडून धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. मागील ५ वर्षात देशातील २५ विद्यार्थ्यांनी रॅगिंगमुळे आत्महत्या (Suicide due to Ragging) केली आहे. माहितीच्या अधिकाराखाली (RTI) UGC ने माहिती दिली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी १ जानेवारी २०१८ ते १ ऑगस्ट २०२३ या कालावधीत रॅगिंगमुळे विद्यार्थ्यांच्या झालेल्या आत्महत्या ही आकडेवारी मागितली होती. या प्रश्नाचे उत्तर देताना UGC ने म्हटले आहे की, "मागील ५ वर्षात देशातील २५ विद्यार्थ्यांनी रॅगिंगमुळे वैतागून आत्महत्या केली आहे. यामध्ये सर्वाधिक आत्महत्येचे प्रमाण महाराष्ट्र आणि तामिळनाडु या राज्यात आहे. दोन्ही राज्यात प्रत्येकी ४ विद्यार्थ्यांनी रॅगिंगमुळे आत्महत्या केले आहे. तर ओडिसा राज्यात ३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे."

Chandrayaan 3 Landing : चांद्रयान-३ लँडिंगचे थेट प्रक्षेपण दाखवा; देशातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुचना

रॅगिंग म्हणजे काय? 

महाविद्यालयाच्या आत किंवा बाहेर कोणत्याही प्रकारे कोणत्याही विद्यार्थ्याला त्रास देणे, टोमणे मारणे, अपमान करणे किंवा मानसिक त्रास देणे, ज्युनिअरला तुमच्या बोलण्याने, लिहून, वाचून किंवा अनैतिक काम करून त्रास देणे रॅगिंगमध्ये येते. तसेच ज्युनियरला लाज वाटेल किंवा त्याला मानसिक दडपण येईल असे कोणतेही काम रॅगिंगच्या श्रेणीत येते. याशिवाय ज्युनियरला त्याचे वैयक्तिक काम करायला लावणे किंवा त्याचे कोणत्याही स्वरुपात शोषण करणे, त्याचा मानसिक किंवा शारीरिक शोषण करणे, त्याच्या इच्छेविरुद्ध काम करायला लावणे, हे सर्व रॅगिंगमध्ये येते. कोणत्याही शाळा, महाविद्यालय आणि वसतिगृहातील कोणत्याही विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला त्याचा पेहराव, जात धर्माच्या आधारे अपमानास्पद शब्द बोलणे. याशिवाय विचित्र नावांनी हाक मारणे, हे सर्व रॅगिंगच्या श्रेणीत येते.  

कुठे आणि कशी कराल?

तक्रार रॅगिंगच्या तक्रारी अनेक प्रकारे करता येतात. तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये तक्रार नोंदवू शकता, नॅशनल हेल्पलाइनवर तक्रार करू शकता किंवा पोलिसांची मदत घेऊ शकता. कोणीतरी तुमच्यासाठी तक्रार देखील करू शकते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या हेल्पलाइन नंबर १८०० १८०० ५५२२ वर तक्रार करू शकता. याशिवाय, तुम्ही helpline@antiragging.in वर मेल करून तक्रार नोंदवू शकता. UGC च्या वेब पोर्टलला भेट देऊन देखील तक्रार करता येते. गंभीर समस्या असल्यास, तुम्ही पोलिसांकडे तक्रार करू शकता आणि दोषींवर एफआयआर दाखल करू शकता. तसेच antiragging.in वर जाऊन तुम्ही तुमची समस्या सांगू शकता. amanmovement.org वरही तक्रार करता येईल.

NEP 2020 : कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय, राज्याचे स्वतंत्र शैक्षणिक धोरण तयार करणार

शिक्षेची तरतूद?

विद्यार्थ्यांनी त्यांच्या कॅम्पसमध्ये किंवा बाहेर कुठेही रॅगिंग होणार नाही, याची काळजी शैक्षणिक संस्थांनी घ्यावी. एखाद्या विद्यार्थ्याने याबाबत तक्रार केल्यास त्यावर सात दिवसांत कारवाई करावी. विशेष म्हणजे जर महाविद्यालयांनी या तक्रारींकडे दुर्लक्ष केले, कारवाई करण्यास टाळाटाळ केली तर संबंधित महाविद्यालयावरही कारवाई होऊ शकते. रॅगिंगमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी असलेला विद्यार्थी दोषी मानला जाईल. तो विद्यार्थी  पकडला गेल्यास त्याला दोन वर्षांची शिक्षा आणि दहा हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. रॅगिंग प्रकरणात एक विद्यार्थी  किंवा विद्यार्थ्यांचा गट पकडला गेला नाही, तर घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा रॅगिंगमध्ये सहभाग असल्याचे मानले जाईल, अशी तरतूदही रॅगिंगविरोधी कायद्यात करण्यात आली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo