तलाठी भरती : अर्जात दुरुस्तीची संधी नाकारली ; विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती

विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज भरताना नजर चुकीने झालेल्या बाबी दुरुस्त करता येत नाहीत.शासनाने तलाठी भरतीसाठी नियुक्त केलेल्या कंपनीकडे तक्रार नोंदवून काहीही फायदा होत नाही.

तलाठी भरती : अर्जात दुरुस्तीची संधी नाकारली ; विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती
talathi bharti

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्याच्या महसूल विभागातर्फे (Department of Revenue ) तलाठी भरतीची (Talathi recruitment ) प्रक्रिया राबवली जात आहे. परंतु, अर्ज केल्यानंतर त्यात झालेली चूक दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध नाही (Denied the opportunity to amend the application form ). त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये (student) असंतोष आहे. पुन्हा वेगळा अर्ज भरता येत नसल्याने हे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाप्रमाणे (MPSC) राज्य शासनाने भरतीसाठी नियुक्त केलेल्या कंपनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भरलेल्या अर्जात दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

   स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक वर्षांपासून तलाठी भरतीची प्रतीक्षा होती. अखेर राज्यातील ४ हजार ६४४ जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली. अनेक वर्षांपासून परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी त्यामुळे सुखावले. येत्या १७ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास मुदत देण्यात आली आहे. परंतु ,अर्ज भरताना झालेली चूक दुरुस्त करण्याची संधी उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे.

हेही वाचा : शिक्षक भरती : खासगी संस्थांमधील भरतीसाठी गुणोत्तर बदलले, पारदर्शकता येणार?

तलाठी भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करताना विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या गुणपत्रिकेवरील क्रमांक सबमिट करावा लागतो. एकदा सबमिट केलेल्या बैठक क्रमांकावर पुन्हा अर्ज करता येत नाही. विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज भरताना नजर चुकीने झालेल्या बाबी दुरुस्त करता येत नाहीत. शासनाने तलाठी भरतीसाठी नियुक्त केलेल्या कंपनीकडे तक्रार नोंदवून काहीही फायदा होत नाही. त्यामुळे चार ते पाच वर्षांपासून केलेल्या अभ्यासावर केवळ एकच चुकीमुळे पाणी फेरले जाणार का? अशी भीती विद्यार्थ्यांना वाटत आहे.

     तलाठी भरतीसाठी अर्ज केलेल्या पल्लवी अहिर या विद्यार्थ्याने सांगितले , ऑनलाइन अर्ज भरताना माझ्याकडून नजर चुकीने AHIR ऐवजी ABIR असे आडनाव टाईप झाले. अर्जात भरलेल्या आडनावात मला दुरुस्ती करायची आहे. परंतु संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या हेल्प डेस्कवर तक्रार नोंदवल्यानंतर 'तुम्हाला भरलेल्या अर्जात कोणतेही बदल करता येणार नाही, तसेच तुम्हाला प्रवेश शुल्क परत मिळणार नाही किंवा तुमचे प्रवेश प्राप्त होणार नाही' असे उत्तर कळविले जाते. विद्यार्थ्यांकडून झालेल्या अशा लहान चुकांमुळे त्यांना परीक्षेपासून अपात्र ठरवले जात असेल तर त्यांचे खूप मोठे नुकसान होणार आहे.  त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी ,असे निवेदन मी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठवले आहे.

एमपीएससी स्टुडंट राईट्सचे महेश बडे म्हणाले, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. त्याचप्रमाणे तलाठी भरतीसाठी भरलेला अर्जात सुद्धा दुरुस्ती करण्याची संधी द्यायला हवी. अन्यथा हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.