शिक्षक भरती : खासगी संस्थांमधील भरतीसाठी गुणोत्तर बदलले, पारदर्शकता येणार?

शिक्षक भरती करण्यासाठी असलेल्या पवित्र प्रणालीवर नियुक्तीसाठी शिक्षकांची शिफारस करण्यासाठी असलेल्या १:१० प्रमाणाऐवजी १:३ असे प्रमाण करण्याबाबत मंत्रीमंडळाने दि. १३ जूनच्या बैठकीमध्ये निर्देशित केले होते.

शिक्षक भरती : खासगी संस्थांमधील भरतीसाठी गुणोत्तर बदलले, पारदर्शकता येणार?
Teachers Recruitment in Maharashtra

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

खासगी संस्थांमध्ये शिक्षक भरती (Teachers Recruitment) करण्यासाठी असलेल्या पवित्र प्रणालीवर (Pavitra Portal) नियुक्तीसाठी शिक्षकांची शिफारस करण्यासाठी असलेल्या १:१० प्रमाणाऐवजी १:३ असे प्रमाण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने (Education Department) घेतला आहे. खाजगी संस्थाचे शिक्षक निवडीचे व नियुक्तीचे अधिकार अबाधित ठेवून शिक्षक भरती प्रक्रीया अधिक पारदर्शक होण्यासाठी उपाययोजना केल्याचा दावा विभागाकडून करण्यात आला आहे.

शिक्षण विभागाकडून या निर्णयाचा जीआर काढण्यात आला आहे. खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थेच्या शाळेमध्ये भरती प्रक्रीयेतील गैरव्यवहार टाळणे व गुणवत्तेवर आधारीत निवड प्रक्रीयेत पारदर्शकता आणणे यासंदर्भात उपाययोजना करण्यामध्ये १:१० प्रमाणात मुलाखतीसाठी उमेदवार उपलब्ध करुन देण्याची तरतूद करण्यात आल्यामुळे अजूनही अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी दाखल जनहित याचिकेवर न्यायालयाने दिलेले आदेश विचारात घेऊन खाजगी संस्थाचे शिक्षक निवडीचे व नियुक्तीचे अधिकार अबाधित ठेवून शिक्षक भरती प्रक्रीया अधिक पारदर्शक होण्यासाठी उपाययोजना करणे क्रमप्राप्त असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याचे जीआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

11th Admission : द्विलक्षी विषयांसाठीही आजपासून नोंदवा पसंती, एकाच विषयाला मिळेल प्रवेश

शिक्षक भरती करण्यासाठी असलेल्या पवित्र प्रणालीवर नियुक्तीसाठी शिक्षकांची शिफारस करण्यासाठी असलेल्या १:१० प्रमाणाऐवजी १:३ असे प्रमाण करण्याबाबत मंत्रीमंडळाने दि. १३ जूनच्या बैठकीमध्ये निर्देशित केले होते. त्याप्रमाणे घेण्यात आलेल्या निर्णयानुसार मुलाखतीसह विकल्प निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील शिक्षण सेवकांच्या मुलाखतीद्वारे अंतिम निवडीसाठी प्रत्येक रिक्त शिक्षकीय जागेकरीता उपलब्ध असल्यास समांतर आरक्षणासह शासन निर्णय, दिनांक ७.२.२०१९ अन्वये विहीत केलेल्या १:१० प्रमाणाऐवजी १:३ या गुणोत्तराप्रमाणे उमेदवारांचा प्राथम्य क्रम, गुणानुक्रम, पदासाठीचे माध्यम, प्रवर्ग, विषय व बिंदूनामावलीनुसार उच्चतम गुणप्राप्त उमेदवारांची निवडसूची त्या व्यवस्थापनाच्या लॉगिनवर उपलब्ध करुन देण्यात येईल.

मंत्री महोदय, मुलांना तरी खोटे आश्वासन देऊ नका; मंत्री केसरकरांवर आपची टीका

संबंधित शैक्षणिक संस्थेने अशा उमेदवारांची मुलाखत घेऊन मुलाखत व अध्यापन कौशल्याद्वारे एकूण ३० गुणांसंदर्भात या उमेदवारांचे गुणपत्रक व निकाल पवित्र प्रणालीवर जाहीर करावयाचा आहेत. त्या आधारे पवित्र पोर्टलमधील शिफारस केलेले आरक्षण व विषय विचारात घेऊन उच्चतम गुणप्राप्त झालेल्या उमेदवाराची रिक्त पदावर निवड करावयाची आहे. त्यानुसार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी विहीत केलेल्या एकूण ३० गुणासंदर्भात आयुक्त (शिक्षण) यांनी मानक कार्यपध्दती (Standard Operating Procedure) तयार करावी, असे जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD