पोलीस आणि CRPF भरतीच्या उमेदवारांना दिलासा; चार दिवसांच्या अंतराने मैदानी चाचण्या

मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अश्या उमेदवारांना किमान 4 दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील, असा निर्णय घेतल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे.  

पोलीस आणि CRPF भरतीच्या उमेदवारांना दिलासा;  चार दिवसांच्या अंतराने मैदानी चाचण्या

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यात १९ जून पासून सर्वत्र सुरू होत असलेल्या पोलीस भरती (Police Recruitment) आणि राज्य राखीव पोलीस दल (SRPF Recruitment) यांच्या मैदानी चाचणीच्या तारखा एकाच दिवशी किंवा सलग दिवशी लागून आल्याने वर्षानुवर्ष मेहनत घेणाऱ्या उमेदवारांच्या भविष्याचा विचार करून, सरकारने पोलीस भरती व SRPF भरतीच्या तारखा बदलाव्यात, अशी मागणी खासदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांनी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलाकडून या मागणीची दखल घेण्यात आली आहे. पोलीस भरती 2022-23 मध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केले आहेत व त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अश्या उमेदवारांना किमान 4 दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा (Different dates will be given at 4 days) दिल्या जातील, असा निर्णय घेतल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) दिली आहे.  

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरणे साठी मैदानी चाचणी परीक्षा 19 जून पासून संपूर्ण राज्यभर सुरु होणार आहे. उमेदवारांना विविध पदांकरिता (पोलीस शिपाई, चालक, बँडसमन, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरुंग विभाग शिपाई) एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकांत अर्ज करता येतात. त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा लागोपाठचे दिवशी दोन पदांकरिता मैदानी चाचणी साठी हजर राहण्याबाबतची स्थिती निर्माण होवू शकते. त्यामुळे काही उमेदवरांची गैरसोय होवू शकते. त्यामुळे सर्व घटक प्रमुखांना व Mahait विभागास सूचना देण्यात आली आहे की, ज्या उमेदवारास एकच वेळी दोन पदांकरिता मैदानी चाचणीस हजर राहणे साठी सूचना दिली असेल,असा उमेदवार पाहिल्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर त्या उमेदवारांना दुसरी ठिकाणी वेगळी तारीख देण्यात यावी, अशा सूचना केल्याचे महाराष्ट्र पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले आहे. 

दुसऱ्या ठिकाणचे घटक प्रमुखांनी अशा उमेदवारांची मैदानी चाचणी घ्यावी. तसेच मैदानी चाचणीची पहिली तारीख आणि दुसरी तारीख यामध्ये किमान ४ दिवसांचे अंतर असावे. मात्र या करिता उमेदवार पहिल्या मैदानी चाचणीस हजर होता. याचे लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणी वेळी सादर करावे लागतील, असे पोलीस दलाकडून सांगण्यात आले आहे.