विद्यार्थ्यांना मराठी नकोशी; 'नीट'चे आकडे पाहिल्यावर बसेल धक्का

महाराष्ट्रातून यावर्षी परीक्षेसाठी देशात सर्वाधिक २ लाख ७७ हजार ९०३ विद्यार्थ्यांनी तर देशभरातून २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

विद्यार्थ्यांना मराठी नकोशी; 'नीट'चे आकडे पाहिल्यावर बसेल धक्का
NEET in Marathi

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये (Medical Education) प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या नीट परीक्षेचा (NEET Exam 2023) निकाल मंगळवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. यावेळी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) विद्यार्थ्यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये मराठी माध्यमातून (Marathi Medium) ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वर्षागणिक कमी होत चालल्याचे आढळून आले आहे. २०१९ मध्ये हा आकडा तब्बल ३१ हजार २३९ एवढा होता. तो कमी होत १ हजार ८३३ पर्यंत खाली आला आहे. (National Eligibility Cum Entrance Test - UG)

'एनटीए'कडून यावर्षी १३ भाषांमधून परीक्षा घेण्यात आली. महाराष्ट्रातून परीक्षेसाठी देशात सर्वाधिक २ लाख ७७ हजार ९०३ विद्यार्थ्यांनी तर देशभरातून २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये इंग्रजी माध्यमासाठी सर्वाधिक १६ लाख ७२ हजार तर हिंदी माध्यमासाठी २ लाख ७६ हजार १८० विद्यार्थी इच्छूक होते. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर गुजराती भाषा आहे. या माध्यमातून परीक्षेसाठी ५३ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी होती. विशेष म्हणजे मागील पाचही वर्षांत हा आकडा जवळपास तेवढाच आहे.

NEET RESULT : नीट परीक्षेचा निकाल जाहीर

बंगाली भाषेचा टक्काही वाढला आहे. बंगाली भाषा चौथ्या क्रमांकावर असून यंदा ४३ हजार ८९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. २०१९ मध्ये हा आकडा केवळ ४ हजार ७५० एवढाच होता. तमिळ भाषिक विद्यार्थ्यांची आपल्या भाषेला पसंती वाढत चालली आहे. २०१९ मध्ये तमिळसाठी केवळ १ हजार १७ विद्यार्थी इच्छूक होती. यंदा ३० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

मराठी भाषेबाबत हा प्रवास उलटा सुरू आहे. २०१९ मध्ये मराठी भाषेतून परीक्षेसाठी ३१ हजार २३९ विद्यार्थ्याची नोंद होती. त्यानंतर दरवर्षी ही संख्या कमी होत चालली आहे. यंदा केवळ १ हजार ८३३ विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतून परीक्षेसाठी नोंदणी केल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्यामुळे बहुतेक विद्यार्थी इंग्रजीतूनच परीक्षा देण्याला पसंती देत असल्याचे दिसते. देशात परीक्षेसाठी सर्वाधिक विद्यार्थी नोंदणी महाराष्ट्रातून होत असताना मराठी भाषेतून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का मात्र नगण्य असून तोही दरवर्षी कमीच होत चालल्याचे चित्र आहे.

‘एससी’ विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ; सर्व अभिमत विद्यापीठे, खाजगी महाविद्यालयांना लागू

मागील पाच वर्षातील भाषानिहाय विद्यार्थी नोंदणी (कंसात २०१९ ते २०२३ अनुक्रमे विद्यार्थी संख्या)

  • इंग्रजी - (१२ लाख ४ हजार ९६८, १२ लाख ६३ हजार, १२ लाख ६५ हजार ५२०, १४ लाख ७६ हजार २४, १६ लाख ७२ हजार ९१४)
  • हिंदी - (१ लाख ७९ हजार ८५७, २ लाख ४ हजार ३९९, २ लाख २८ हजार ६४१, २ लाख ५८ हजार ८२७, २ लाख ७६ हजार १८०)
  • मराठी - (३१ हजार २३९, ६ हजार २५८, २ हजार ९१३, २ हजार ३६८, १ हजार ८३३)
  • बंगाली - (४ हजार ७५०, ३६ हजार ५९३, ३५ हजार ११०, ४२ हजार ६६३, ४३ हजार ८९०)
  • गुजराती - (५९ हजार ३९५, ५९ हजार ५५, ४९ हजार ९४२, ४९ हजार ६३८, ५३ हजार २७)
  • तमिळ - (१ हजार १७, १७ हजार १०१, १९ हजार ८६८, ३१ हजार ९६५, ३० हजार ५३६)

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo