कौशल्य चाचणी रद्द करण्यास जयंत पाटील, पटोलेंसह विद्यार्थी संघटनांचाही विरोध

'एमपीएससी'ने लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गासाठी दि. ७ एप्रिल रोजी घेण्यात आलेली टंकलेखन कौशल्य चाचणी (Typing Skill Test) रद्द केली आहे.

कौशल्य चाचणी रद्द करण्यास जयंत पाटील, पटोलेंसह विद्यार्थी संघटनांचाही विरोध
Nana Patole and Jayant patil

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२१ मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गासाठी दि. ७ एप्रिल रोजी घेण्यात आलेली टंकलेखन कौशल्य चाचणी (Typing Skill Test) रद्द केली आहे. या चाचणीदरम्यान अनेक तांत्रिक अडचणी उद्भवल्याने काही विद्यार्थ्यांना समस्यांना तोंड द्यावे लागले, असे कारण आयोगाकडून देण्यात आले आहे. पण या निर्णयाला विरोध होऊ लागला असून विद्यार्थी संघटनानी (MPSC Students Organisation) हा निर्णय बदलण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीही कौशल्य चाचणी रद्द करण्याच्या आयोगाच्या निर्णयाला विरोध केला आहे. या दोघांनीही नुकतेच आयोगाला पत्र पाठवून सरसकट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय बदलण्याची मागणी केली आहे. केवळ अडचणी आलेल्या विद्यार्थ्यांचीच पुन्हा परीक्षा घ्यावी. ज्या विद्यार्थ्यांना अडचणी आल्या नाहीत, त्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाऊ नये, अशी मागणी आयोगाकडे करण्यात आली आहे.

हेही वाचा : स्वाधार योजनेचे अर्ज भरा आता ऑनलाईन ; विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर म्हणाले, कौशल्य चाचणी सरसकट घेणे हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. अनेक विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे ही परीक्षा देत यश मिळविले. तांत्रिक अडचणी काही विद्यार्थ्यांनाच आल्या आहेत. केवळ त्यांचीच चाचणी घेणे अपेक्षित असताना आयोगाने इतर विद्यार्थ्यांना यामध्ये घेतल्याने नाराजी आहे. ही परीक्षा केवळ मुंबईत होते. राज्यभरातून विद्यार्थ्यांना मुंबईत पुन्हा यावे लागणार आहे. त्याचा खर्च, मानसिक त्रास सहन करावा लागेल. ज्या विद्यार्थ्यांना काहीच अडचणी आल्या नाहीत, त्यांनाही हा भूर्दंड आहे. याचा विचार करून आयोगाने निर्णय बदलण्याची आवश्यकता आहे.

दरम्यान, जयंत पाटील यांनी म्हटले होते की, टंकलेखन चाचणीदरम्यान खूप कमी विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे तांत्रिक अडचणी आलेल्या विद्यार्थ्यांचीच चाचणी पुन्हा घ्यावी. ही चाचणी यशस्वीपणे पूर्ण केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करून त्या विद्यार्थ्यांना मानसिक त्रासातून दिलासा द्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. तर तांत्रिक अडचण आली त्याच विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याऐवजी सरसकट सर्वांची पुन्हा परीक्षा घेणे हे विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे. तांत्रिक अडचणींची शिक्षा त्या विद्यार्थ्यांना कशासाठी दिली जात आहे. त्यामुळे यशस्वी विद्यार्थ्यांची यादी जाहीर करावी, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2