NEET UG 2024 प्रश्नपत्रिका लीक झालीच नाही; NTA ने दिले स्पष्टीकरण

विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेल्या प्रश्नपत्रिकेच्या छायाचित्राचा परीक्षेच्या वास्तविक प्रश्नपत्रिकेशी काहीही संबंध नसल्याचे एजन्सीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

NEET UG 2024 प्रश्नपत्रिका लीक झालीच नाही; NTA ने दिले स्पष्टीकरण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 सोशल मीडियावर काल पासून NEET UG 2024 प्रश्नपत्रिका लीक (Question paper leak)झाली असल्याची बातमी व्हायरल होत आहे. या विषयी पत्रक प्रसिध्द  करत NTA ने स्पष्टीकरण दिले आहे. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेल्या प्रश्नपत्रिकेच्या छायाचित्राचा परीक्षेच्या वास्तविक प्रश्नपत्रिकेशी काहीही संबंध नसल्याचे एजन्सीच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच NEET UG प्रश्नपत्रिका लीक झालीच नाही, असा दावा NTA ने केला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना अफवांवर लक्ष देऊ नये, असे आवाहन NTA  कडून करण्यात आले आहे.

NTA च्या वरिष्ठ संचालिका डॉ. साधना पाराशर यांनी सांगितले की, "परीक्षांसाठी एजन्सीची सुरक्षा व्यवस्था लक्षात घेता, सोशल मीडियावर NEET UG 2024 पेपर लीकचे दावे पूर्णपणे निराधार आहेत. परीक्षेत वापरलेल्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे ऑडिट करण्यात आले आहे. सर्व परीक्षा केंद्रांचे दरवाजे बंद केल्यानंतर परीक्षा कक्षांमध्ये बाहेरील व्यक्तीला प्रवेश दिला जात नसल्याने सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही त्यांच्यावर नजर ठेवण्यात आली होती. 

 डॉ. साधना म्हणाल्या की, "एनटीए प्रत्येक तपासणीनंतर मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करते अनफेअर मीन्स यूज (UFM) प्रकरणे ओळखण्यासाठी  UFM च्या बाबतीत, विहित नियमांनुसार कारवाई केली जाते, ज्यामध्ये उमेदवारी रद्द करणे, तसेच आरोपी विद्यार्थ्याला भविष्यातही कोणत्याही परीक्षेत बसण्याची परवानगी न देणे आदिचा समावेश आहे. 
 दरम्यान,  NTA ने काल प्रसिध्द केलेल्या निवेदनानुसार, राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील एका केंद्रावर काही विद्यार्थ्यांनी परीक्षा संपण्यापूर्वी प्रश्नपत्रिका जबरदस्तीने नेल्या होत्या. या प्रश्नपत्रिकेचा कथित पेपर फुटीच्या घटनेशी संबंध लावला जात होता.

NTA ने देशभरातील वैद्यकीय, दंत, आयुष आणि नर्सिंग कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या विविध पदवी अभ्यासक्रमांच्या (MBBS, BDS, BAMS, BHMC, BYNS, BSMS, BSc नर्सिंग) प्रवेशासाठी यावर्षी NEET UG 2024 परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या 24 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी एजन्सीने देशातील आणि परदेशातील एकूण 571 शहरांमध्ये 4750 परीक्षा केंद्रे तयार केली होती. एकूण नोंदणी केलेल्या उमेदवारांमध्ये 10 लाखांहून अधिक मुले आणि 13 लाखांहून अधिक मुली आहेत.