स्वाधार योजनेचे अर्ज भरा आता ऑनलाईन ; विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश

स्वाधार योजनेअंतर्गत नव्याने विकसित करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरचे  लोकार्पण येत्या सोमवारी (दि. २२) पुण्यातील विश्रांतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात सकाळी ११.३० वाजता करण्यात येणार आहे.

स्वाधार योजनेचे अर्ज भरा आता ऑनलाईन   ; विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत (Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana) नव्याने विकसित करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरचे (software) लोकार्पण आणि सामाजिक न्याय विभागाच्या (Social Justice Department) विविध योजनांच्या यशोगाथेचे प्रकाशन  येत्या सोमवारी (दि. २२) होणार आहे. पुण्यातील  विश्रांतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात (Dr. Babasaheb Ambedkar Social Justice Bhavan,Vishrantwadi ) सकाळी ११.३० वाजता त्यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच यावेळी समान संधी केंद्राच्या प्राचार्यांना मार्गदर्शनही केले जाणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. परंतु,त्याकडे दूरलक्ष दिले जात होते. पूर्वी या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात होते. परंतू विद्यार्थ्यांना सुलभरित्या अर्ज करता यावेत म्हणून या योजनेचे ऑनलाईन सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले. 

 सहायक आयुक्त समाज कल्याण पुणे या कार्यालयामार्फत अनुसूचित जाती, विजाभज, विमान व इमाव इत्यादी प्रवर्गासाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्याप्रमाणेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही एक कल्याणकारी योजना राबविली जाते.  स्वाधार योजनेसाठी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये १० कोटी ९ लाख ३८ हजार  खर्च करण्यात आला. तसेच आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये माहे एप्रिल २०२३ अखेर ६ कोटी ५६ लाख ७२ हजार खर्च करण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास स्वाधार योजनेसाठी नुकतीच  ८ कोटी ८० लाख ३ हजार रुपये इतकी रक्कम प्राप्त झाली आहे.दरम्यान, स्वाधार योजनेबाबत विद्यार्थ्यांना काही समस्या असल्यास त्यांनी सहायक आयुक्त समाज कल्याण पुणे  कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन  समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.