धक्कादायक : UGC NET पेपर विकला फक्त 5-10 हजार रुपयांना; ऑनलाईन विक्रीचा धंदा 

परीक्षेच्या सुमारे 48 तास आधी, NTA NET परीक्षेच्या प्रश्नपत्रिका टेलिग्रामवर 5,000 ते 10,000 रुपयांना विकल्या जात होत्या.

धक्कादायक : UGC NET पेपर विकला फक्त 5-10 हजार रुपयांना; ऑनलाईन विक्रीचा धंदा 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

UGC NET पेपर लीक प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. परीक्षेपूर्वी UGC NET 2024 च्या प्रश्नपत्रिका फक्त  5-10 हजार रुपयांना ऑनलाइन विकल्या जात होत्या. अनेक टेलिग्राम चॅनेल्स आणि टेलिग्राम ग्रुप्स वर UGC NET प्रश्नपत्रिका विकण्याचा धंदा सुरु होता.

यूजीसी नेट परीक्षेच्या 2024 च्या सुमारे दोन दिवस आधी नेट प्रश्नपत्रिकेची विक्री डार्क वेब आणि टेलिग्रामवर (NET Question Paper Sale on Dark Web and Telegram)सुरू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सुरुवातीच्या अहवालांनुसार, टेलिग्रामवर अनेक गट आढळले जेथे UGC NET परीक्षा 2024 शी संबंधित विषयांवर चर्चा केली जात होती आणि पेपर विकले जात होते. मात्र, या टेलिग्राम वाहिन्यांवर नेटची प्रश्नपत्रिका कोठून आली, हे अद्याप कळू शकलेले नाही. पण ते डार्क वेबवरून आले असावे असा अंदाज आहे

मीडिया रिपोर्ट नुसार , लीक झालेल्या पेपरचे स्क्रीनशॉट, लिंक्स आणि सारांश आणि इतर माहिती गृह मंत्रालयाने शिक्षण मंत्रालयाला दिली होती. परीक्षेच्या सुमारे 48 तास आधी, NTA NET परीक्षेच्या प्रश्नपत्रिका टेलिग्रामवर 5,000 ते 10,000 रुपयांना विकल्या जात होत्या.

दरम्यान UGC NET जून 2024 ची परीक्षा 18 जून रोजी घेण्यात आली होती. गेल्या 4 वर्षांपासून ऑनलाइन परीक्षा घेतल्यानंतर, यंदा NET ने ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. 18 जून रोजी देशभरात यूजीसी नेट परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, 19 जून रोजी रात्री 10 वाजल्यानंतर, शिक्षण मंत्रालयाकडून एक ट्विट आले की NTA - UGC NET परीक्षा 2024 रद्द करण्यात आली आहे.  मात्र, तेव्हा पेपरफुटीच्या प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला नव्हता.