MPSC चा कारभार विद्यार्थ्यांना नैराश्यात ढकलणारा ; युवासेनेचा गंभीर आरोप 

विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्वरित कृती आराखडा जाहीर करावा. पुढील १५ दिवसात याविषयी कार्यवाही न झाल्यास आंदोलन उभारु ; युवासेना

MPSC चा कारभार विद्यार्थ्यांना नैराश्यात ढकलणारा ; युवासेनेचा गंभीर आरोप 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) चा कारभार हा विद्यार्थ्यांना नैराश्यात (Frustrated student) ढकलणारा आहे. लाखो विद्यार्थी आपल्या पतिस्थितीवर मात करून अधिकारी होण्याचे स्वप्न बघतात. मात्र, ऐन परीक्षेवेळी होणाऱ्या नियोजनशून्य कारभारामुळे (Unplanned management) विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जात आहे, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांच्या युवासेनेने (Yuvasena) केला आहे. तसेच आयोगाने रखडलेल्या परीक्षा व झालेल्या परीक्षांचे निकाल त्वरित जाहीर न केल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.

एमपीएससी न्यायिक सेवा (जेएमएफसी), पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय-२०२२), मंत्रालय सहायक, विक्रीकर निरीक्षक, दंत शल्यचिकित्सक या परीक्षांचा निकाल रखडला आहे. प्रशासकीय अधिकारी राज्यसेवा, वैद्यकीय शिक्षण, तालुका क्रीडा अधिकारी व इतर पदाच्या मुलाखती रखडल्या आहेत. शिवाय मोठ्या प्रमाणावर भरती प्रकियेसंदर्भातील परीक्षा रखडल्या असतील तर विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती काय असेल? असा सवाल युवासेनेचे राज्य सहसचिव कल्पेश यादव यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना विचारला आहे. 

 विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने विद्यार्थी करीत असलेले आरोप आम्ही गंभीरतेने घेत आहोत. एमपीएससीचा कारभार हा संथ झाला आहे का ? असा सवाल विद्यार्थ्यांकडून येत आहे. आयोगात अंतर्गत राजकारण सुरू असल्याचा आरोप गंभीर आहे. राजकारण विद्यार्थ्यांच्या जीवावर उठणारे नसावे,  अशी आमची ठाम भूमिका आहे. 

याआधीही अशा ढिसाळ कारभारामुळे काही विद्यार्थ्यांनी नैराश्यातून काही अनुचित प्रकार केले होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्वरित कृती आराखडा जाहीर करावा. प्रलंबित भरती प्रकिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा पुढील १५ दिवसात याविषयी कार्यवाही न झाल्यास आम्ही आंदोलन उभारू याची नोंद घ्यावी, असे कल्पेश यादव यांनी आयोगाला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.