Sarthi : परदेशात उच्च शिक्षणासाठी जागा ७५, पात्र ठरले फक्त २१ विद्यार्थी

महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती या योजनेअंतर्गत प्रत्येक शैक्षणिक वर्षामध्ये पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी एकूण ७५ लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

Sarthi : परदेशात उच्च शिक्षणासाठी जागा ७५, पात्र ठरले फक्त २१ विद्यार्थी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य सरकारच्या महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती (Maharaja Sayajirao Gaikwad Scholarship Scheme) या योजनेअंतर्गत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी केवळ २१ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. प्रत्यक्षात योजनेअंतर्गत ७५ जागा उपलब्ध असताना पात्र विद्यार्थ्यांची संख्या ५० टक्केही नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Maharashtra Government)

 

ही योजना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक शैक्षणिक वर्षामध्ये पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी एकूण ७५ लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी सारथी संस्थेमार्फत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. अर्जांची छाननी करून छाननी समितीने विद्यार्थ्यांची यादी समितीच्या शिफारशीसह निवड समितीकडे सादर केली होती. प्रधान सचिव (नियोजन) यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या बैठकीत निवड यादीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

SPPU News : विद्यापीठ करणार शेती; कमवा व शिका योजेतून सेंद्रीय शेतीला देणार चालना

 

योजनेअंर्गत पीएचडी अभ्यासक्रमासाठी २५ आणि पदव्युत्तर पदवी व पदविका अभ्यासक्रमासाठी ५० अशा एकूण ७५ जागा उपलब्ध आहेत. त्याअनुषंगाने प्राप्त अर्ज विचारात घेऊन २०२३-२४ या वर्षामध्ये परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी राज्य शासनाकडून प्रसिध्द करण्यात आली आहे.

 

निवड यादीनुसार केवळ २१ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यामध्ये पीएचडी अभ्यासक्रमासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ तीन एवढीच आहे. अभियांत्रिकीसाठी पाच जागा असताना एक विद्यार्थिनी आणि विज्ञानसाठीच्या पाच जागांसाठी दोन विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे. पदव्युत्तर पदवी व पदविका अभ्यासक्रमांसाठी १८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. एकूण जागांची संख्या ७५ असताना केवळ २१ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

 

निवड झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्याने खोटी माहिती किंवा कागदपत्रे सादर केल्याचे सिध्द झाल्यास त्यांना ताबडतोब पुढील शिक्षणासाठी अटकाव केला जाईल व त्याच्याकडून झालेल्या खर्चाची रक्कम १५ टक्के चक्रवाढ व्याजाने वसूली करण्यात येईल. अशा विद्यार्थ्यांचा काळ्या यादीत समावेश केला जाईल. कायद्यानुसार त्यांच्याविरुध्द कारवाईही केली जाईल, असेही राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO