विद्यापीठातील १११ प्राध्यापक पदाच्या जाहिरातीची प्रतीक्षा संपली 

ऑक्टोबर महिन्यातच भरतीची जाहिरात प्रसिध्द होणार आहे. कारण सध्या संवर्ग निहाय आरक्षण निश्चित करण्याचे काम सुरू असून हे काम पूर्ण होण्यास आणखी १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे.

विद्यापीठातील १११ प्राध्यापक पदाच्या जाहिरातीची प्रतीक्षा संपली 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) विविध विभागांमधील प्राध्यापकांच्या १११ रिक्त जागाच्या भरतीसाठी (Recruitment of 111 Vacancies of Professors) आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. मात्र, ऑक्टोबर महिन्यातच भरतीची जाहिरात (Recruitment Advertisement) प्रसिध्द होणार आहे. कारण सध्या संवर्ग निहाय जागा निश्चित करण्याचे काम सुरू असून हे काम पूर्ण होण्यास आणखी १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. परिणामी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करण्याची इच्छा असणा-या उमेदवारांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे .

हेही वाचा : शिक्षण UGC NET : नेट परीक्षेसाठी नोंदणीला सुरूवात, असा भरा अर्ज

राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने महाविद्यालयासह विद्यापीठातील प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यास मंजूरी दिली आहे. गोंडवाना विद्यापीठातील भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुध्दा शासनाकडून आरक्षण व रोष्टर तपासणी करून घेतली आहे. मात्र, विद्यापीठ स्तरावरील काही महत्त्वाच्या बाबींची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे विद्यापीठातील पदांच्या भरातीस थोडा विलंब होत आहे.सप्टेंबर महिना अखेरीस जाहिरात प्रसिध्द करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न होता. मात्र, प्राध्यापक भरतीची जाहिरात प्रसिध्द होण्यास ऑक्टोबर महिन्याचा दुसरा किंवा तीसरा आठवडा उजाडणार आहे,असे विद्यापीठातील संबंधित अधिका-यांनी सांगितले.

विद्यापीठात प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. विद्यापीठातील प्राध्यापकांची अपूरी संख्या हे त्यांचे एक कारण असू शकते,असे बोलले जात आहे. विद्यापीठातील अनेक विभागांमध्ये प्राध्यापकांची पदे गेल्या तीन चार वर्षात मोठ्या संख्येने रिक्त झाली आहेत.त्यामुळेच गेल्या महिन्यात कंत्राटी पध्दतीने प्राध्यापकांची पदे भरण्यात आली. शासनाकडून प्राध्यापक भरातीला मान्यता मिळत नसल्याने विद्यापीठाला आपल्या फंडातून अनेक पदे भरावी लागली. मात्र, दरवर्षी त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत आहे. विधी विभागात प्राध्यापक नसल्याने सुमारे दोन वर्षांपूर्वी लॉ कौन्सिलने विद्यापीठाला नोटीस पाठवली होती.परंतु, प्राध्यापक भरती झाल्यानंतर हे चित्र बदलेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.