धाडसी कामगिरी केलेल्या मुलांचा होणार गौरव; राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी करा अर्ज

भारतीय बालकल्याण परिषदेतर्फे गेल्या ६६ वर्षांपासून हे पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांसाठी विविध स्त्रोतांकडून शिफारशी प्राप्त होतात.

धाडसी कामगिरी केलेल्या मुलांचा होणार गौरव; राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी करा अर्ज
National Bravery Award 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शाळकरी मुलेही (School Children) अनेकदा कठीण प्रसंगी अतुलनीय शौर्य गाजवत अनेकांचे प्राण वाचवतात. गुन्हेगारांचा धाडसाने मुकाबला करतात. त्यांच्या या धाडसी कामगिरीचा गौरव भारतीय बालकल्याण परिषदेतर्फे (Indian council for child welfare) दरवर्षी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार (National Bravery Award) देऊन केला जातो. २०२३ च्या पुरस्कारांसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. बालकाचे वय ६ ते १८ वर्षांदरम्यान असायला हवे.

भारतीय बालकल्याण परिषदेतर्फे गेल्या ६६ वर्षांपासून हे पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांसाठी विविध स्त्रोतांकडून शिफारशी प्राप्त होतात. मात्र, ज्या बालकांच्या शौर्याची नोंद घेण्यात आलेली नाही, अशा मुलांचे धाडस आणि पराक्रमाचे कौतुक व्हावे म्हणून अर्ज मागविण्यात आले आहेत. जीवाला धोका किंवा शारीरिक दुखापत होण्याचा धोका असताना असामाजिक तत्व, गुन्हेगारांविरुद्ध धाडसाने कृती करणाऱ्या बालकांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात येणार आहे.

शिक्षकांसाठी खुशखबर; केंद्रप्रमुख पदाच्या २ हजार ३८४ जागांसाठी होणार भरती, कोण आहे पात्र?

अर्जदाराने अर्जासमवेत त्याने बजावलेल्या शौर्याची माहिती देणारे वर्णन २५० शब्दांत द्यावयाचे आहे. त्याच्या पुराव्यासाठी वृत्तपत्रीय कात्रण, प्रथम माहिती अहवालाची (एफआयआर) प्रत, घटनेविषयी दोन सक्षम अधिकाऱ्यांनी साक्षांकित केलेली कागदपत्रे जोडावीत. बालकाचे वय ६ ते १८ वर्षांदरम्यान असावे. बालक ज्या शाळेत शिक्षण घेत आहे, त्या शाळेचे मुख्याध्यापक, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, राज्य बालकल्याण परिषदेचे सरचिटणीस, जिल्हाधिकारी किंवा समपदस्थ अधिकारी, पोलिस अधिकारी यापैकी दोन जणांची शिफारस जोडणे आवश्यक आहे. १ जुलै २०२२ ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत घटना घडलेली असावी.

ITI Admission : ‘आयटीआय’मध्ये दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

 राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची निवड भारतीय बालकल्याण समितीतर्फे गठित उच्चाधिकार समितीच्या माध्यमातून करण्यात येते. अर्ज सादर केला म्हणजे निवड होईलच, असे नाही. कोणत्याही कारणास्तव नाकारलेले अर्ज पुन्हा विचारात घेतले जाणार नाहीत. पुरस्कारासाठी आलेला अर्ज निवड समितीला योग्य वाटला, तर ते आपल्या विवेक बुद्धीनुसार अटी, नियम शिथिल करण्याचा विचार करू शकतात.

राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्यांना त्यांचे शालेय शिक्षण होईपर्यंत आर्थिक मदत केली जाते. तसेच पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर, व्यावसायिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्थसाहाय्य केले जाते. अर्जाची प्रत राज्याच्या बालकल्याण समितीकडे पाठविणे आवश्यक आहे.

पुरस्कारांच्या अधिक माहितीसाठी - www.iccw.co.in 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo