आरटीई प्रवेशाच्या अडथळ्यांना सुरुवात ; एकाचवेळी १२ विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारला          

पालकांनी प्रवेश अर्ज भरला तेव्हा घर ते शाळा यामधील अंतर एक किलोमीटरच्या आत असल्याचे दिसून येत होते,परंतु प्रवेश पत्र डाउनलोड करून घेतल्यानंतर घर ते शाळेचे अंतर १.२२ कि.मी. इतके दिसून येत आहे. त्यामुळे पडताळणी समितीने विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारला आहे.          

आरटीई प्रवेशाच्या अडथळ्यांना सुरुवात ; एकाचवेळी १२ विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारला          

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) राबविल्या जात असलेल्या आरटीई प्रवेश (RTE admission २०२३) प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र, पडताळणी समितीने एसएसपीएमएस प्रायमरी स्कूलमध्ये sspms primary school लॉटरीद्वारे प्रवेश मिळालेल्या १२ विद्यार्थ्यांचा प्रवेश अंतराचे कारण दाखवून नाकारला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत पालकांनी पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतरही प्रश्न सुटला नाही. त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे.                     

आरटीई प्रवेशासाठी अर्ज केलेल्या हजारो विद्यार्थ्यांमधून निवडक विद्यार्थ्यांना प्रवेशाचे एसएमएस प्राप्त झाले. प्रवेशाचे पत्र डाउनलोड करण्यासाठी पालकांना काही दिवस वाट पहावी लागली. कारण तांत्रिक कारणांमुळे प्रवेशाचे संकेतस्थळ काही  दिवस बंद पडले होते. त्यात आता प्रवेश मिळूनही काही मुलांना घर ते शाळा यामधील अंतराचे कारण दाखवून प्रवेश नाकारला जात आहे. पालकांनी प्रवेश अर्ज भरला तेव्हा घर ते शाळा यामधील अंतर एक किलोमीटरच्या आत असल्याचे दिसून येत होते.परंतु, प्रवेश पत्र डाउनलोड करून घेतल्यानंतर घर ते शाळेचे अंतर १.२२ कि.मी. इतके दिसून येत आहे. त्यामुळे पडताळणी समितीने विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारला आहे.          

हेही वाचा : आधार नोंदणी पोर्टलचा घोळ अन् सुट्ट्यांनी वाढवलं शाळांचं टेन्शन!

एसएसपीएमएस स्कूल मध्ये प्रवेश मिळालेले सर्व विद्यार्थी हे ताडीवाला रोड येथील रहिवासी आहेत. या परिसरात इंग्रजी माध्यमाची दुसरी कोणतीच शाळा नाही. तसेच आरटीई कायद्याअंतर्गत एक किलोमीटर ते तीन किलोमीटर परिसरातील शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. परंतु, येथे शाळेने नाही तर पडताळणी समितीनेच प्रवेश नाकल्याचा प्रकार समोर आला आहे.                     

हेही वाचा : बोगस शाळा : माजी शिक्षक अन् अधिकाऱ्यांनीच घातला संस्थाचालकांना गंडा!      

 आरटीई अंतर्गत प्रवेश मिळाल्यामुळे यातील काही पालकांनी आपल्या मुलाचा दुसऱ्या शाळेतील प्रवेश रद्द करून त्या शाळेतून दाखला काढून आणला आहे. मात्र,आरटीई अंतर्गत लॉटरीद्वारे मिळालेला प्रवेश नाकारल्यामुळे काय करावे, असा प्रश्न या पालकांसमोर उभा राहिला. त्यामुळे पालकांनी पालिकेच्या शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांची याबाबत संवाद साधला. अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाशी संवाद साधून मगच प्रवेश निश्चित होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.              

 लॉटरीद्वारे १२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळूनही तो प्रवेश नाकारला जात असेल तर पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या कार्यालयात येत्या २  मे रोजी 'शाळा भरो आंदोलन' केले जाईल, असा इशारा भिम छावा संघटनेचे अध्यक्ष शाम गायकवाड यांनी दिला आहे.यावेळी पालकांबरोबर रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे उपस्थित होते.