तलाठी भरती : ‘डबल’ फायद्यासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज भरताना गैरमार्गाचा वापर

तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी दि. २६ जून रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे.

तलाठी भरती : ‘डबल’ फायद्यासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज भरताना गैरमार्गाचा वापर
Talathi Recruitment 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्याच्या महसूल विभागाकडून (Revenue Department) तलाठी भरतीसाठी (Talathi Recruitment) ऑनलाईन अर्ज भरून घेतले जात आहेत. या प्रक्रियेत इच्छूकांना एकाच ठिकाणाहून अर्ज भरता येत आहेत. पण काही विद्यार्थ्यांकडून दहावीचा परीक्षा (SSC Exam) क्रमांक किंवा आईच्या नावात काहीसा बदल करून दोन-तीन ठिकाणांहून अर्ज भरला जात असल्याचे समोर आले आहे. अशाप्रकारे गैरमार्गाचा वापर करून अर्ज भरू नये, असे आवाहन स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केले आहे. (Talathi Bharti 2023)

तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी दि. २६ जून रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. मात्र, या प्रक्रियेत अर्ज व शुल्क भरून अर्ज सादर केल्यानंतर अर्जात कोणतीही दुरुस्ती करता येत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे दुरूस्ती करण्याच संधी देण्याची मागणी केली जात होती. पण महसूल विभागाने अशी सुविधा उपलब्ध करून देण्यास नकार दिला आहे.

तलाठी भरती : ऑनलाईन अर्जात दुरुस्ती करण्याची संधी नाहीच, शासनाकडून स्पष्टीकरण

त्यातच आता काही विद्यार्थ्यांकडून चुकीची माहिती भरून नव्याने अर्ज भरले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत समन्वय समितीने अशा विद्यार्थ्यांना सतर्क केले आहे. ‘काही जण दहावीचा परीक्षा क्रमांक बदलून किंवा आईच्या नावात थोडा फरक करून दोन-तीन ठिकाणी अर्ज भरत आहेत. तुम्ही पकडला जाल. विद्यार्थ्यांनी कोणत्याही कसल्याही गैरप्रकाराचा वापर करू नये. इमानदारीने अभ्यास करा. छोटी चूक खूप महागात पडू शकते. त्यामुळे काळजी घ्या, असे आवाहन स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केले आहे.

याविषयी ‘एज्युवार्ता’शी बोलताना समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर म्हणाले, तलाठी भरतीसाठी एकाच ठिकाणाहून अर्ज भरता येतो. दुसऱ्या ठिकाणासाठी अर्ज भरला जात नाही. त्यामुळे काही विद्यार्थी दोन-तीन वेळा परीक्षा देण्याची संधी मिळावी, या उद्देशाने इयत्ता दहावी परीक्षेच्या क्रमांकात बदल करून नव्याने अर्ज भरत आहेत.

तलाठी भरतीत महाघोटाळा? SIT मार्फत चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, बड्या अधिकाऱ्यांवर आरोप

आईच्या नावातही काहीसा बदल केला जात आहे. म्हणजे आशा असे नाव असेल तर दुसऱ्यांदा अर्ज भरताना आशाबाई असे लिहिले जात आहे. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये काही दिवस चालणार आहे. त्याचाच फायदा घेण्यासाठी काही विद्यार्थ्यांकडून असा प्रकार केला जात आहे. पण ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास विद्यार्थ्यांना महागात पडू शकते, असे कवठेकर यांनी सांगितले.

दरम्यान, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महसूल विभागाने एक दिवसाची मुदत वाढ दिल्याने विद्यार्थ्यांना १८ जुलै रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत अर्ज भरता येतील. तर २० जुलैपर्यंत ऑनलाईन शुल्क भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD