तलाठी भरतीत महाघोटाळा? SIT मार्फत चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, बड्या अधिकाऱ्यांवर आरोप

२०१९ तलाठी पदभरतीचा निकाल लागल्यानंतर ही नोकर भरती पारदर्शक पद्धतीने झाली नसल्याच्या तक्रारी उमेदवारांनी राज्यातील जवळजवळ प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात केल्या होत्या.

तलाठी भरतीत महाघोटाळा? SIT मार्फत चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, बड्या अधिकाऱ्यांवर आरोप
Talathi Recruitment 2019

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महापरीक्षा पोर्टलद्वारे २०१९ मध्ये तलाठी पदभरतीच्या (Talathi Recruitment) १ हजार ८०९ पदांसाठी अर्ज मागवून परीक्षा घेण्यात आली होती. या तलाठी भरतीत भ्रष्टाचार (Corruption in Recruitment) झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार महसूल विभागाकडे (Revenue Department) या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी विनंती केली होती. पण आता गैरप्रकारात नवीन साक्षीदार तसेच तथ्य समोर आल्याने या घोटाळ्याचा नव्याने तपास करण्याची मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे. त्यामुळे सध्या तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या उमेदवारांची नोकरी धोक्यात येण्याची शक्यता आहे. (Maharashtra News)

समितीने या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांच्याकडे केली आहे. २०१९ तलाठी पदभरतीचा निकाल लागल्यानंतर ही नोकर भरती पारदर्शक पद्धतीने झाली नसल्याच्या तक्रारी उमेदवारांनी राज्यातील जवळजवळ प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात केल्या होत्या. पण फक्त अहमदनगर जिल्हाधिकायांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली. अहमदनगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्थानिक पातळीवर तलाठी पदभरतीचा तपास करून या नोकर भरतीत झालेला भ्रष्टाचार समोर आणला. या तपासाचा अहवाल स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने माहितीच्या अधिकारात मागवून घेतला होता, असे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

MPSC : तीन महिन्यांत केवळ हजार पदांची शिफारस अन् शासनाकडून ८५४ पदांसाठी मागणीपत्र

अहमदनगर तलाठी भरतीत निवड आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या मूळ कागदपत्र तपासणी वेळी काही उमेदवार शंकास्पद आढळून आले. त्यामुळे जिल्हाधिऱ्यांमार्फत निवड आणि प्रतीक्षा यादीतील एकूण २३६ उमेदवारांचे सीसीटीव्ही फुटेज आणि त्याबाबत स्वयंस्पष्ट अभिप्राय परीक्षा घेणाऱ्या महा-आपटी कडून (महापरीक्षा पोर्टल) मागविण्यात आले. पण २३५ उमेदवारांचा डेटा व्यापक स्वरूपाचा असून तत्काळ उपलब्ध करून देणे शक्य नसून फक्त शंकास्पद उमेदवारांचा डेटा उपलब्ध करून दिला जाईल, असे महापरीक्षा पोर्टलच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या दूरध्वनी चर्चेत अहमदनगरच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. त्यावर १४ उमेदवारांबाबतचा अहवाल पाठविला. त्यामध्ये गैरप्रकार झाल्याचे आढळून आले. तलाठी भरती रद्द करण्याबाबत शासनाला विनंती करण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते, असे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने म्हटले आहे.

इतक्या वर्षांनी पुन्हा तक्रार का?

मुंबई पोलीस पेपरफुटीत पुणे तलाठी भरती २०१९ मध्ये एका संशयिताला अटक झाली होती. या सर्व घोटाळ्यांमध्ये आरोपी तसेच साक्षीदार असलेल्या काहींनी आम्हाला संपर्क करून, तलाठी भरती मध्ये झालेले सर्व गैरप्रकार नुकतेच सांगितले. त्याआधारे गुन्हे दाखल झाल्यास किंवा SIT स्थापन झाल्यास हे साक्षीदार पोलिसांसमोर किंवा SIT समोर साक्ष देण्यास तयार आहेत. यासोबतच मुंबई पोलीस पेपरफुटीमुळे पोलीस विभागाने तपासासाठी मागील दोन वर्षात पोलीस भरतीत झालेल्या गैरप्रकारांची माहिती सर्व जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून मागवून घेतली आहे. पोलीस भरती पेपरफुटीचा तपास करताना तलाठी गैरप्रकाराबाबतही माहिती समोर येत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे २०१९ तलाठी भरती गैरप्रकारांचा तपास करणे गरजेचे असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.

तलाठी भरती : अर्जात दुरुस्तीची संधी नाकारली ; विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती

महापरीक्षा पोर्टलचे तत्कालीन संचालकांनी अहमदनगर तलाठी भरतीच्या तपासात सहकार्य केले नसल्याचे अहवालानुसार स्पष्ट होते. त्यामुळे त्यांची तसेच महा- आयटीच्या तत्कालीन सर्व अधिकाऱ्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. जवळ-जवळ प्रत्येक जिल्ह्यातील गैरमार्गाचा अवलंब करून नोकरीस लागलेल्या शंकास्पद तलाठी उमेदवारांची नावे आमच्याकडे आहेत, असा दावा समितीने केला आहे. समितीने महसूल विभागाचे तत्कालीन अपर मुख्य सचिवांनी कर्तव्यात कसूर केल्याचा आरोपही केला आहे. गैरप्रकारांचा अहवाल आलेला असतानाही त्यांनी अहमदनगर तसेच राज्यातील इतर सर्व जिल्ह्यात तलाठ्यांच्या नियुक्तीचे आदेश निर्गमित केले, असा दावा समितीने केला आहे.

समितीच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे –

१. २०१९ अहमदनगर तलाठी पदभरतीत झालेल्या पडताळणीच्या धर्तीवर सर्व जिल्ह्यातील निवड झालेल्या तलाठी उमेदवारांची नव्याने पडताळणी करण्यात यावी.

२. महसूल विभागामार्फत या गैरप्रकारांची अधिकृत तक्रार पोलीस विभागात नोंद करण्यात यावी.

३. या गैरप्रकारांचा तपास करण्यासाठी निवृत्त / सीटिंग मा. न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती (SIT) नेमन्यात यावी व तपास करण्यात यावा. या चौकशी समितीत पोलीस तसेच इतर विभागातील त्रयस्थ अधिकाऱ्यांचा समावेश असावा.

४. महसूल आणि महा-आयटी मधील अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसते आहे, त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD