SPPU News : कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळणार? तोडगा न निघाल्याने दुसऱ्या दिवशीही काम बंद

विद्यापीठातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.

SPPU News : कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळणार? तोडगा न निघाल्याने दुसऱ्या दिवशीही काम बंद
SPPU Protest Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (SPPU) शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन (Non teaching staff Protest) सलग दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. विविध मागण्यांबाबत कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी (Dr Suresh Gosavi) व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मंगळवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या आंदोलनामुळे विद्यापीठातील कामकाद विस्कळीत झाले असून परीक्षांच्या निकालावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Savitribai Phule Pune University News)

विद्यापीठातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. पदोन्नतीसह विविध प्रमुख मागण्यांसाठी कर्मचारी आग्रही आहेत. याबाबत १० ते १५ दिवसात उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालय आणि विद्यापीठ प्रशासन यांच्यासह संयुक्त कृती समितीची बैठक आयोजित केली जाईल, अशी मागणी मान्य करण्यात आली होती. परंतु, विद्यापीठाने बैठक आयोजित केली नाही, त्यामुळे संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

पुस्तकांच्या अनुवादाबाबत घ्या काळजी! UGC कडून मार्गदर्शक तत्वे जारी

कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर मंगळवारी सायंकाळी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची विद्यापीठात बैठक घेतली. यावेळी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संघटनांशी चर्चा केली. यावेळी डॉ. सुनिल धिवार, संतोष मदने, बाळासाहेब आंत्रे, शिवाजी उत्तेकर, रघुवीर व्हावळ, किशोर घडीयार, बसवंत गजलवार, अशोक रानावडे, संजय नेवसे, मंगेश कुडवे, प्रभू देवकर, चेरीयल, सहदेव ढोरमारे, हनुमंत खांदवे आदी उपस्थित होते.

बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा झाली. मात्र, काही मागण्या या आर्थिक बाबींशी संबंधित असल्याने त्यावर निर्णय होऊ शकला नाही. याबाबत उच्च शिक्षण विभागाच्या सचिवांशी चर्चा केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पण त्यामुळे पदाधिकाऱ्यांचे समाधान झाले परिणामी, आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय संघटनांनी घेतल्याचे मदने यांनी सांगितले.

SPPU NEWS: कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून बेमुदत आंदोलन, विद्यापीठाचा निकाल लांबण्याची शक्यता

दरम्यान, विद्यापीठांचे निकाल रखडल्यामुळे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. त्यात कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी  आंदोलनावर गेल्यास परीक्षा विभागातील कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे निकाल उशिरा लागल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD