Maharashtra Rain : अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

हवामान विभागाने १९ जुलैला रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील सावित्री, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे.

Maharashtra Rain : अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
Maharashtra Rain Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

Maharashtra News : देशातील अनेक राज्यांना पावसाचा (Monsoon) जोरदार तडाखा बसल्यामुळे मागील काही दिवसांपासून तिथल्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आता अशीच परिस्थिती महाराष्ट्रातही निर्माण होऊ लागली आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील काही भागातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना बुधवारी सुट्टी देण्यात आली आहे. (Holiday for schools and colleges in Raigad district due to heavy rain)

रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी हे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी, खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, नगरपालिका, अनुदानित व विनानुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व व्यवसाय व प्रशिक्षण विभागाच्या संस्थांना सुट्टी जाहीर केल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Balbharati News : पाच महिन्यांपूर्वीच झाले हॅकिंग, बालभारतीच्या तक्रारीतून धक्कादायक माहिती समोर

हवामान विभागाने १९ जुलैला रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील सावित्री, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. सध्या अतिवृष्टी होत असून दुपारी एक वाजता समुद्रास भरती असल्याने सखल भागांमध्ये पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही आदेशात म्हटले आहे.

राज्यातील बहुतांश भागात मान्सून सक्रिय होत आहे. कोकण आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाकडून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून अनेक ठिकाणी मुसळधार पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, देशातील दिल्ली, हिमाचल प्रदेश, गुरुग्राम, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक या  राज्यांमध्येही मुसळधार पाऊस कोसळत आहे. बहुतेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे या राज्यांतील काही जिल्ह्यांमधील  शाळा कॉलेज पावसामुळे बंद करण्यात आल्या आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD