प्रवेश प्रक्रियेतील गैरव्यवहार थांबविण्यात सीईटी सेल कडून कुचराई; युवासेनेचा आरोप

प्रवेश प्रक्रियेत संस्था स्तरावरील प्रवेशात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार सुरू असल्याची तक्रार युवासेना सहसचिव कल्पेश यादव यांनी सीईटी सेल कडे केली होती.

प्रवेश प्रक्रियेतील गैरव्यवहार थांबविण्यात सीईटी सेल कडून कुचराई; युवासेनेचा आरोप
CET Cell Admission 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुणे (Pune) तसेच पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) मधील महाविद्यालयात व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरु आहेत. या प्रवेश प्रक्रियेत (Admission Process) संस्था स्तरावरील प्रवेशात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार सुरू असल्याची तक्रार युवासेना (Yuva Sena) सहसचिव कल्पेश यादव (Kalpesh Yadav) यांनी सीईटी सेल (CET Cell) कडे केली होती. त्यावर सेलकडून बेकायदेशीररित्या करण्यात आलेले प्रवेश रद्द होतील, अशी सूचना देण्यात आली. या सूचनेला केराची टोपली दाखवून हे नियमबाह्य प्रवेश न थांबवता संस्था चालक कोट्यवधी रुपये कमवत असल्याचा आरोप यादव यांनी केला. त्यानंतर चौकशीसाठी निरीक्षक न नेमता सेलने जुनेच परिपत्रक नव्याने प्रसिद्ध केल्यामुळे युवासेना आक्रमक झाली आहे.

यादव हे काही महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेतील गैरव्यवहाराबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहेत. याविषयी सांगताना ते म्हणाले, शासनाचे नियम, पोटनियम १३ प्रमाणे प्रवेश प्रक्रिया न राबवता आर्थिक गैरव्यवहारातूनच केंद्रिय प्रवेश फेरीनंतर रिक्त जागा तसेच संस्थास्तरीवरील जागांचे प्रवेश चालू ठेवण्याची मानसिकता काही संस्थांची आहे.

SPPU News : विद्यापीठातील 'एनसीसी'चे विद्यार्थी प्रथमच देणार 'दाहिना सॅल्युट'

आम्ही याबाबत पहिले निवेदन दिल्यानंतर सीईटी सेल कडून महाविद्यालयांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर महाविद्यालयांवर आम्ही करडी नजर ठेवली होती. पण अनेक महाविद्यालयात हे प्रकार थांबलेले नाहीत. त्यामुळे पुन्हा सीईटी सेल कडे तक्रार करून निरीक्षक नेमण्याची विनंती केली होती. पण या विनंतीला दाद न देता जुनेच परिपत्रक पुन्हा काढण्याचा मोठा खटाटोप सीईटी सेलने केल्याचे यादव यांनी सांगितले.

भ्रष्ट महाविद्यालय आणि त्यांचे संस्थाचालक यांच्या सेवेसाठी सीईटी सेल आहे का?, असा सवाल उपस्थित करून यादव म्हणाले, तातडीने निरीक्षक नेमून हा भ्रष्टाचार थांबविण्याचे प्रयत्न करण्याऐवजी येथील अधिकारी आणि कर्मचारी फक्त कागदी घोडे नाचवत आहेत. आम्ही आज पुन्हा सीईटी सेलकडे याबाबत शेवटची विनंती केली आहे. तसेच स्वतः त्यांनी निरीक्षक नेमावे अन्यथा आम्हाला ते नेमण्याचे अधिकार द्यावेत, अशी मागणी केली आहे. यावर कडक उपाययोजना पुढील २ दिवसांत झाल्या नाही तर मात्र आम्ही याबाबत तीव्र भूमिका घेऊन हा भ्रष्टाचार थांबवू, असा इशारा यादव यांनी दिला आहे.

 शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo