प्राध्यापकांचे काम वाढले : पहिल्या, दुसऱ्या वर्षाच्या उत्तरपत्रिका कॉलेजच तपासणार !      

येत्या मंगळवारी (दि.२) विद्यापीठात होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे.

प्राध्यापकांचे काम वाढले : पहिल्या, दुसऱ्या वर्षाच्या उत्तरपत्रिका कॉलेजच तपासणार !      
Savitribai Phule Pune University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी (SPPU) संलग्न महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या पहिल्या व दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका (Answer Sheet) तपासण्याची जबाबदारी महाविद्यालयांकडेच (College) दिली जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील प्राध्यापकांचे काम वाढणार आहे. येत्या मंगळवारी (दि.२) विद्यापीठात होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे. (Savitribai phule Pune University)           

पुणे विद्यापीठाची सलग्न पुणे अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांची संख्या सुमारे १००० आहे. त्यात कला, वाणिज्य आणि विज्ञान या विद्याशाखेअंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला दरवर्षी सुमारे साडेसात लाख विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करावा लागतो. परीक्षा घेऊन प्राध्यापकांकडून कॅप द्वारे उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करण्यास बरेच दिवस लागतात. परंत, येत्या एक ऑगस्टपासून नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळेच विद्यापीठाने प्रथम व द्वितीय वर्षाच्या उत्तरपत्रिका महाविद्यालयाकडे तपासण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.              

हेही वाचा : MPSC Exam : आजच्या परीक्षेने केले दोन विक्रम; आयोगाच्या इतिहासात पहिल्यांदाच...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य देविदास वायदंडे यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे डॉ.धोंडीराम पवार, डॉ.संदिप पालवे, विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ.मनोहर चासकर डॉ.पराग काळकर, डॉ. विजय खरे , डॉ.दीपक माने , परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांच्या समितीने या संदर्भातील अहवाल तयार केला आहे. परंतु, हा निर्णय घेण्यापूर्वी प्राध्यापक संघटनेला विश्वासात घेतले जाणार आहे. त्यासाठी डॉ. वायदंडे यांच्या समितीमध्ये प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष के. एल. गिरमकर, प्रा. व्ही एम शिंदे , प्रा.रमेश गायकवाड यांना निमंत्रित सदस्य म्हणून सहभागी करून घेतले आहे. या समितीची बैठक येत्या मंगळवारी बैठक होणार आहे.                                  

विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या 'कॅप' मध्ये अनेक प्राध्यापक स्वतःहून उत्तरपत्रिका तपासण्याचे काम करण्यासाठी जातात. मात्र काही प्राध्यापकांना उत्तर पत्रिका तपासण्याचे काम नको असते. परंतु, आपल्या महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांबरोबरच आता द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापनाचे काम त्या त्या महाविद्यालयातील प्राध्यापकांनाच करावे लागणार आहे. परिणामी उत्तरपत्रिका तपासणीचे काम टाळणाऱ्या प्राध्यापकांचे काम वाढणार आहे.                          

हेही वाचा : बालभारतीने वाढवले पालकांचे बजेट; या पाठ्यपुस्तकांच्या किंमती २०० रुपयांच्या पार      

कोरोनामुळे राज्यातील सर्वच विद्यापीठांचे शैक्षणिक वेळापत्रक विस्कळीत झाले होते.परंतु, मुंबई कोल्हापूर विद्यापीठासह राज्यातील बहुतांश विद्यापीठ आणणे आपले वेळापत्रक रुळावर आणले आहे. पुणे विद्यापीठ याला अपवाद आहे.नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आणि बिघडलेले शैक्षणिक वेळापत्रक रुळावर आणण्यासाठी विद्यापीठाला प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाच्या कामाचा भार महाविद्यालयाकडे द्यावा लागणार आहे. तसेच महाविद्यालयांना सुद्धा सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासून एक ऑगस्टपूर्वी निकाल जाहीर करण्यासाठी विद्यापीठाला सहकार्य करावे लागणार आहे. परंतु, यामुळे प्राध्यापकांना आपल्या उन्हाळी सुट्टीवर पाणी सोडावे लागणार आहे.

"प्रथम वर्षाच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम सध्या महाविद्यालयाकडेच आहे. परंतु आता त्यात द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची भर पडणार आहे. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाकडूनच प्रसिद्ध केले जाणार असून त्यानुसारच परीक्षा होणार आहेत. केवळ तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका विद्यापीठातर्फे 'कॅप'च्या माध्यमातून तपासल्या जाणार आहेत, असे विद्यापीठातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले."