आरटीई प्रवेशाची प्रतीक्षा पाहणाऱ्या पालकांना यंदाही आर्थिक भूर्दंड

राज्य शासनाकडून आरटीई प्रवेश प्रक्रिया कोणत्या पद्धतीने राबवावी, याबाबत अद्याप एकमत झाले नाही.

आरटीई प्रवेशाची प्रतीक्षा पाहणाऱ्या पालकांना यंदाही आर्थिक भूर्दंड

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

RTE admission News : जानेवारी महिना अर्धा संपला तरी अद्याप आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली नाही. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही आरटीई प्रवेशाची प्रतीक्षा पाहणाऱ्या पालकांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आरटीईतून प्रवेश मिळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पालकांना बऱ्याचवेळा जवळच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश घेऊन ठेवावा लागतो.पण आरटीईतून प्रवेश मिळाल्यानंतर संबंधित शाळेकडून पालकांनी भरलेले शुल्क त्यामना परत मिळत नाही.त्यामुळे अनेक पालकांचे आर्थिक नुकसान होते. ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने लवकरात लवकर आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी विविध संघटनांकडून केली जात आहे.
राज्य शासनाकडून आरटीई प्रवेश प्रक्रिया कोणत्या पद्धतीने राबवावी, याबाबत अद्याप एकमत झाले नसल्याचे बोलले जात आहे. कर्नाटक राज्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवता येऊ शकेल का ? या संदर्भातील चाचपनी मागील वर्षापासून सुरू आहे. तसेच केवळ इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येच नाही तर इतर माध्यमांच्या शाळांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना प्रवेश देता येऊ शकतो का? याबाबतही विचार व्हायला हवा. असे मत शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे पुढील काळात आरटीई प्रवेशासाठी नोंदणीकृत शाळांची संख्या वाढवणे शक्य आहे का ? या दृष्टीने सुद्धा विचार केला जाऊ शकतो.

दरम्यान राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने राज्य शासनाकडे आरटीई  प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला आहे.परंतु, अद्याप त्यास मान्यता मिळालेली नाही. सर्वसाधारणपणे जानेवारी महिन्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होते. त्यामुळे राज्य शासन याबाबत केव्हा आणि काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आप पालक युनियनचे पदाधिकारी मुकुंद किर्दत म्हणाले, राज्य शासनाकडून दरवर्षीच आरटीई  प्रवेश प्रक्रियेला विलंब केला जातो. त्यामुळे पालकांना इतर शाळांमध्ये प्रवेश घेऊन ठेवावा लागतो. त्यासाठी शाळेचे शुल्कही भरावे लागते. आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत एखाद्या शाळेत प्रवेश मिळाला तर संबंधित शाळेकडून या पालकांना पुन्हा शुल्क परत मिळत नाही. सर्वसाधारणपणे फेब्रुवारी महिन्यात सीबीएससी व इतर बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत आलेली असते. त्यामुळे अनेक पालकांना आर्थिक परिस्थिती नसताना इतर शाळांमध्ये प्रवेश घेऊन ठेवावा लागतो.त्यामुळे लवकरात लवकर आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करावी.