RTE Admission : प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश

प्रवेशाची ऑनलाईन लॉटरी १२ एप्रिलला काढल्यानंतर संबंधित पाल्यांच्या पालकांना १३ एप्रिलपासून शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करायचे होते.

RTE Admission : प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश
RTE Admission

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) प्रवेशासाठी काढण्यात आलेल्या लॉटरीनुसार प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पण सुरूवातीला झालेल्या तांत्रिक गोंधळामुळे पालकांमध्ये प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यातच जवळपास आठवडाभराचा कालावधी गेला. यापार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने (Education Department) आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. (RTE Admission 2023 Latest News)    

राज्यातील १ लाख १ हजार ८४६ जागांसाठी ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. त्यात पुण्यातील (Pune) १५ हजार ५०१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. प्रवेशाची ऑनलाईन लॉटरी १२ एप्रिलला काढल्यानंतर संबंधित पाल्यांच्या पालकांना १३ एप्रिलपासून शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करायचे होते. पण प्रत्यक्षात पुढील तीन-चार दिवस संकेतस्थळ सुरू होत नव्हते. तांत्रिक घोळामुळे अनेक पालकांना प्रवेशाचे एसएमएसही मिळाले नाहीत. संकेतस्थळ सुरू होत नसल्याने प्रवेशाबाबत माहिती मिळण्यात अडचणी आल्या.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

संकेतस्थळातील तांत्रिक त्रुटीमध्ये प्रत्यक्ष घेण्यास उशिरा सुरूवात झाली. सुरूवातीला शिक्षण विभागाने प्रवेशासाठी २५ एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. ही मुदत मंगळवारी संपत आहे. तसेच मागील काही दिवसांत राज्याच्या अनेक भागात गारपीट, वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला. पालकांना कागदपत्रे गोळा करण्यासाठी विविध तांत्रिक अडचणी आल्याने अजूनही अनेक बालकांचे प्रवेश झालेले नाहीत.

आरटीई 25 टक्के प्रवेश पोर्टलवर अतिरिक्त भार येत असल्याने पालकांना तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास येत आहे. तरी याबाबत पालकांनी कोणतीही भीती बाळगू नये. तसेच ज्या बालकांची प्रवेशासाठी सोडत (लॉटरी) द्वारे निवड झाली आहे अशा बालकांना शाळा प्रवेशाकरिता पुरेसा कालावधी देण्यात येईल, शिक्षण विभागाने स्पष्ट केले होते.

त्यानुसार प्रवेशाची मुदत ८ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी ही माहिती दिली. पुणे जिल्ह्यातील ९३४  शाळांमधील १५ हजार ५९६  जागांसाठी ७७ हजार ५३१ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील १५ हजार ५०१ बालकांची ऑनलाइन लॉटरी द्वारे प्रवेशासाठी निवड करण्यात आली आहे.