उत्कृष्ट शिक्षक घडवून खऱ्या अर्थाने विश्वगुरु होऊ : राज्यपाल रमेश बैस

अनेक राष्ट्रीय नेते परदेशात शिक्षण घेतल्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पुन्हा भारतात परत आले. याचे स्मरण देऊन विद्यार्थ्यांनी विदेशात शिक्षण घेतले तरी देखील देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी परत आले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. 

उत्कृष्ट शिक्षक घडवून खऱ्या अर्थाने विश्वगुरु होऊ : राज्यपाल रमेश बैस
Governor Ramesh Bais

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

जगातील अनेक देशांना चांगल्या शिक्षकांची (Teachers) आवश्यकता आहे. भारताने संपूर्ण जगाकरिता उत्कृष्ट शिक्षक घडवून खऱ्या अर्थाने विश्वगुरु व्हावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी येथे केले. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण (Higher Education) घेतल्यानंतर शिक्षक बनण्याचा देखील पर्याय निवडावा, असेही राज्यपाल म्हणाले.

मुंबईतील सिंगापूर इंटरनॅशनल स्कुल (Singapur International School) या संस्थेच्या २०२३ वर्गाचा पदवीदान समारंभ राज्यपाल बैस यांच्या मुख्य उपस्थितीत संस्थेच्या दहिसर येथील शैक्षणिक संकुलात झाला. त्यावेळी ते बोलत होते. शाळेतील ९७ विद्यार्थ्यांना यावेळी शालान्त आयबी डिप्लोमा प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विशेष प्राविण्य प्राप्त करणाऱ्या स्नातकांचा सत्कार करण्यात आला.   

हेही वाचा : तुमच्या मुलांना 'गुड टच -बॅड टच' विषयी सांगितलंय का? मग या गोष्टी माहिती हव्यातच...

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राज्यपाल बैस म्हणाले, सध्याच्या ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेमध्ये देशाला मोठ्या प्रमाणात अभियंते, व्यवस्थापक, सीए, कंपनी सचिव, अधिकारी, कुशल कामगार व तंत्रज्ञांची आवश्यकता आहे. परंतु त्याहीपेक्षा देशाला चांगले नागरिक घडवणाऱ्या उत्तम शिक्षकांची गरज आहे.

महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी राष्ट्रीय नेत्यांनी विदेशात शिक्षण घेतले, परंतु देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पुन्हा भारतात परत आले. याचे स्मरण देऊन विद्यार्थ्यांनी विदेशात शिक्षण घेतले तरी देखील देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी परत आले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. 

कार्यक्रमाला आमदार मनिषा चौधरी, आमदार पंकज भोयर, सिंगापूर इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका शारोनी मल्लिक, प्राचार्य ग्रॅम कॅसलेक, आयबी प्रमुख अब्सोलोम मुसेवे, स्नातक विद्यार्थी तसेच शिक्षक व पालक उपस्थित होते.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2