मोठी बातमी : पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी 'या' पाच उमेदवारांची नावे निश्चित 

पुणे विद्यापीठातील चार उमेदवारांची अंतिम मुलाखतीसाठी निवड झाली आहे.तर एक उमेदवार विद्यापीठाबाहेरील आहे.

मोठी बातमी : पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी 'या' पाच उमेदवारांची नावे निश्चित 
Savitribai Phule Pune University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू (SPPU Vice Chancellor) पदासाठी १८ व १९ मे रोजी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यातील पाच उमेदवारांची नावे अतिम मुलाखतीसाठी निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसातच विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळणार आहेत. त्यातही विद्यापीठातील विभागात कार्यरत असलेल्या प्राध्यापकाची (Professor) किंवा विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर काम करत असलेल्या व्यक्तीची कुलगुरू पदी निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Savitribai Phule Pune University VC)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या मुलाखतीसाठी २७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यात विद्यापीठातील विविध विभागांमध्ये व विद्यापीठाच्या महत्त्वाच्या पदांवर काम करत असलेल्या ११ उमेदवारांनी कुलगुरू पदासाठी अर्ज केला होता.या उमेदवारांमध्ये कुलगुरू पदासाठी चुरस होती. त्यातील चार उमेदवारांची अंतिम मुलाखतीसाठी निवड झाली आहे.तर एक उमेदवार विद्यापीठाबाहेरील आहे.

हेही वाचा : मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू पदी डॉ.संजीव सोनवणे यांची नियुक्ती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर ,पुणे विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे प्रा. अविनाश कुंभार, भौतिकशास्त्र विभागातील डॉ.संजय ढोले, पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रा. सुरेश गोसावी आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. विजय फुलारी या पाच उमेदवारांची नावे शॉर्ट लिस्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे यातील एकाची कुलगुरूपदी निवड होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे (Sanjeev Sonawane) यांची नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू पदी निवड झाली आहे. डॉ. सोनवणे यांनी शुक्रवारी (दि.१९) पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी सुध्दा मुलाखत दिली आहे. मात्र तत्पूर्वीच सोनवणे यांची मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू पदी निवड झाली. त्यामुळे सर्वच क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2