विद्यार्थी ते कुलगुरू...३५ वर्ष विद्यापीठ अनुभवलेला संशोधक! आज पदभार स्वीकारला

राज्यपाल रमेश बैस यांनी मंगळवारी पुणे विद्यापीठासह मुंबई विद्यापीठ व कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नावांची घोषणा केली. त्यानंतर डॉ. गोसावी यांनी प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याकडून कार्यभार स्वीकारला.

विद्यार्थी ते कुलगुरू...३५ वर्ष विद्यापीठ अनुभवलेला संशोधक! आज पदभार स्वीकारला
Dr. Suresh Gosavi took charge of SPPU VC

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

ज्या विद्यापीठामध्ये पदवीचे शिक्षण घेतले, त्याच विद्यापीठाचे कुलगुरूपद भुषविण्याचा मान मिळणे, तसे दुर्मिळच. डॉ. सुरेश गोसावी (Dr. Suresh Gosavi) यांना ही संधी मिळाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (SPPU) २१ वे कुलगुरू (Vice Chancellor) म्हणून डॉ. गोसावी यांनी आज सायंकाळी पदभार स्वीकारला. १९८८ मध्ये त्यांनी विद्यापीठाची पदवी मिळवली अन् पुढे शिक्षक, विभागप्रमुख, संचालक म्हणून काम केल्यानंतर आज कुलगुरुपदाचा मान त्यांना मिळाला. (Savitribai Phule Pune University New VC)

राज्यपाल रमेश बैस यांनी मंगळवारी पुणे विद्यापीठासह मुंबई विद्यापीठ व कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नावांची घोषणा केली. त्यानंतर डॉ. गोसावी यांनी प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. यावेळी मनस्वी आनंद होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हा आनंद त्यांच्यासाठी खास असाच आहे. ज्या विद्यापीठात पदवी, पदव्युत्तर पदवी, पीएचडी अशा पदव्या मिळवल्या त्याच विद्यापीठाचा गाडा आता त्यांना हाकायचा आहे. ५६ वर्षे वय असलेल्या डॉ. गोसावी यांना संशोधन आणि अध्यापनाचा ३२ वर्षांचा अनुभव आहे.

SPPU : आपलीच माणसे सर्व ठिकाणी बसवण्याचा अट्टाहास! राज्यपाल करणार का हस्तक्षेप?

पाच वर्षाच्या पुढील कार्यकाळात विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यामध्ये कौशल्य निर्माण करण्यास भर देणार असे डॉ. गोसावी यांनी पदभार स्वीकारताना सांगितले. पुढे ते म्हणाले, "शैक्षणिक धोरणावर अधिक भर देऊन विद्यार्थी केंद्रित गुणवत्तापुर्ण व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक उपक्रम राबविणे ह्या बाबीला प्राधान्यक्रम राहील. तसेच विविध योजना आखल्या असून त्याच्या अमलबजावणीसाठी सर्व घटकांना सोबत घेऊन वाटचाल करण्यावर भर राहील.’

अशी झाली डॉ. सुरेश गोसावी यांची वाटचाल -

पदवी – बीएसस्सी इलेक्ट्रॉनिक्स १९८८ मध्ये एन. एम. कॉलेज जळगाव (पुणे विद्यापीठ)

एम.एसस्सी – १९९० मध्ये पुणे विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक-सायन्स विभागातून

पीएचडी – १९९६ मध्ये इलेक्ट्रॉनिक-सायन्स विषयात

पोस्ट डॉक्टरेट फेलोशिप – १९९८ ते २००० अमेरिकेतील ओरेगॉन ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अन्ड टेक्नॉलॉजीमध्ये

कुलगुरू डॉ. गोसावी हे १९९२ मध्ये पुण्यातील स.प. महाविद्यालयात भौतिकशास्त्र विषयाचे लेक्चरर म्हणून रूजू झाले. या महाविद्यालयात ते बारा वर्ष अध्यापन करत होते. त्यानंतर २००४ पासून ते पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेव्हापासून आजपर्यंत पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये ते अध्यापन करत आहेत. याच विभागाचे ते तीन वर्ष प्रमुखही होते. तसेच विविध विभागांचे प्रमुखपदही भूषविले असून काही विभागांचा अजूनही पदभार आहे. सध्या ते स्कूल ऑफ फिजिकल सायन्सचे संचालक आहेत. त्याचप्रमाणे पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रमुख आणि स्कूल ऑफ बेसिक मेडिकल सायन्स या विभागाचे संचालक म्हणून त्यांच्याकडे अतिरिक्त पदभार आहे.

फ्रान्स, जपान, सौदी अरेबिया व ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांमध्ये ते व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणूनही कार्यरत आहेत. विविध पुरस्कारांनीही त्यांचा सन्मान झाला आहे. त्यांच्या नावावर सध्या आठ राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पेटंट आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत २७ विद्यार्थ्यांनी पीएचडी पूर्ण केली असून सध्या आठ विद्यार्थी मार्गदर्शन घेत आहेत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे शेकडो लेख प्रसिध्द झाले आहेत. विद्यापीठातील प्रशासनाचाही त्यांना अनुभव असून सध्या काही अभ्यास मंडळांचे सदस्यही आहेत. विविध संशोधने, प्रयोगशाळांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असून महत्वाच्या जबाबदाऱ्याही पार पाडत आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo