आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात

यंदा परीक्षेसाठी १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.मागील वर्षाच्या तुलनेत यंदा राज्यभरातून तब्बल ८ हजाराहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला मंगळवारपासून (दि.२१) सुरुवात होत आहे. यंदा परीक्षेसाठी १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.मागील वर्षाच्या तुलनेत यंदा राज्यभरातील तब्बल ८ हजाराहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा दहा मिनिटांचा कालावधी वाढून देण्यात आला आहे. तसेच कॉपीमुक्त अभियान अधिक चांगल्या पद्धतीने राबवले जाणार आहे.

    राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेऊन इयत्ता बारावीच्या परीक्षेची संपूर्ण तयारी झाली असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी पूर्ण आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे, त्याचप्रमाणे कोणत्याही अफवांना बळी पडू नये,असे आवाहन केले. गोसावी म्हणाले, मागील वर्षे मार्च- एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत ७ लाख ९१ हजार ६५४ मुलांनी तर ६ लाख ५८ हजार १० मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण १४ लाख ४९ हजार ६६४ विद्यार्थ्यांपैकी १४ लाख ३९ हजार ७३१ विद्यार्थीच परीक्षा प्रविष्ट झाले होते. परंतु यंदा ७ लाख ९२ हजार ७८० मुलांनी तर ६ लाख ६४ हजार ४४१ मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.

कॉपी मुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी परीक्षा केंद्रावर लवकर उपस्थित राहण्याबाबत सर्व विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच दहा मिनिटे आधी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिल्या जात होत्या. परंतु हा निर्णय रद्द करण्यात आला. त्यामुळे पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. त्यामुळे राज्य शासनाने पुन्हा दहा मिनिटे परीक्षेसाठी वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेतला.