मोठी बातमी : परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांना अखेर अटक

शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने बारा ते पंधरा लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा त्यांच्यासह त्यांचा भाऊ दादसाहेब रामचंद्र दराडे यांच्यावर दाखल झाला होता.

मोठी बातमी : परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांना अखेर अटक

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे (Shaileja Darade,Commissioner, Maharashtra State Examination Council) यांना हडपसर पोलिसांनी सोमवारी अटक (arrested) केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल पाच महिन्यांनंतर त्यांना निलंबीत करण्यात आले होते. शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने बारा ते पंधरा लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा त्यांच्यासह त्यांचा भाऊ दादसाहेब रामचंद्र दराडे (रा.इंदापूर) यांच्यावर दाखल झाला होता.

हेही वाचा : केंद्रीय विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना खासदार कोट्यांतर्गत प्रवेश मिळणार का? सरकारचे संसदेत स्पष्टीकरण

शैलजा दराडे व त्यांचा भाऊ दादसाहेब रामचंद्र दराडे  या दोघांवर २३  फेब्रुवारी २०२३ रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी जामिनासाठी प्रयत्न केला . मात्र  पुण्यातील अतिरीक्त जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपुर्व  फेटाळला होता. यानंतर त्यांनी वरच्या न्यायालयात दाद मागितली होती. हा घोटाळा राज्यव्यापी असून फसवणूकीची रक्कम चार ते पाच कोटीपर्यंत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोपट सुखदेव सुर्यवंशी (रा.आटपाडी, सांगली) यांनी फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी हे सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेचे माजी अध्यक्ष आणि प्राथमिक शिक्षण संघाच्या विविध पदांवर पदाधिकारी आहे. त्यांना व इतर शिक्षकांना आरोपी दादासाहेब दराडे याने २०१९ मध्ये सांगितले की, त्याची बहिण शैलजा दराडे प्रशासकीय अधिकारी असून शिक्षक भरती, बदली, तलाठी आणि टीईटी परिक्षा पास करणे अशी कामे करते. त्याच्या सांगण्यानूसार फिर्यादी आणि काही शिक्षकांनी शैलजा दराडे यांची पुण्यातील सेंट्रल बिल्डंगमधील कार्यालयात भेट घेतली होती. त्यांनी डी.एड.पदावर शिक्षक म्हणून बारा लाख, बी.एड. पदावर शिक्षक म्हणून १५  लाख, तलाठी म्हणून १२ लाख आणि टीईटी परीक्षा पास करण्यासाठी चार लाख रुपये दर सांगितला. रक्कम रोख स्वरुपात स्विकारली जाईल, मात्र माझे नाव कोठेही सांगायचे नाही, असे सांगितले होते. त्यानूसार फिर्यादी आणि त्याच्या दोन नातेवाईकांनी २७  लाख रुपये दादासाहेब दराडेला हडपसर येथे दिले होते. मात्र फसवणूक झाल्यावर फिर्यादीने तक्रार दिली. तक्रारीचा तपास करता ४४  जणांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

दरम्यान, शैलजा दराडे यांना सोमवारी अटक करण्यात आली आहे. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, असे  रविंद्र शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (हडपसर) यांनी सांगितले.