बारावीच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे राहणार पडून ; शिक्षकांचा तपासणीवर बहिष्कार

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेने इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षेचा निकाल लांबण्याची शक्यता

बारावीच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे राहणार पडून ; शिक्षकांचा तपासणीवर बहिष्कार

शिक्षकेतर कर्मचारी संघटनेनंतर आता कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेने आंदोलनाचे हत्यार उगारले आहे.जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेने इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षेचा निकाल लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

          महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीची परीक्षा (12th exam) आजपासून (दि.२१) घेतली जात आहे. परीक्षानंतर तात्काळ उत्तर पत्रिका तपासण्याच्या कामाला सुरुवात केली जाते. परंतु, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाने उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना नुकतेच महासंघातर्फे याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

       एक नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित तसेच अंशतः अनुदानावरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व सेवानिवृत्त शिक्षकांना या योजनेचा लाभ तातडीने द्यावा. १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. शासकीय कर्मचाऱ्यांची १०, २०, ३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना त्वरित लागू करावी. निवडश्रेणीसाठी २० टक्क्यांची अट रद्द करावी. वाढीव पदांना रुजू दिनांक पासून मंजुरी द्यावी व आय.टी. विषय अनुदानित करावा. शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरावीत. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी पटसंख्येचे निकष शाळा समितीनुसार असावेत. निवृत्तीचे वय साठ वर्षे करावे, आदी मागण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

 महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाचे.अध्यक्ष डॉ. संजय शिंदे , समन्वयक मुकुंद आंधळकर , सचिव संतोष फाजगे यांच्या स्वाक्षरीचे निवेदन शिक्षण मंत्र्यांना देण्यात आले आहे.