पेपरफुटी, भरमसाठ शुल्क, रखडलेले निकाल अन् विद्यार्थ्यांचा आक्रोश; रोहित पवारांचा सरकारला अल्टीमेटम

पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

पेपरफुटी, भरमसाठ शुल्क, रखडलेले निकाल अन् विद्यार्थ्यांचा आक्रोश; रोहित पवारांचा सरकारला अल्टीमेटम
MLA Rohit Pawar

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

तलाठी भरती (Talathi Bharti) परीक्षांमध्ये झालेली पेपरफुटी, सरळसेवा परीक्षांसाठी असलेले भरमसाठ शुल्क, रखडलेली शिक्षक भरती (Teachers Recruitment) अशा विविध प्रश्न व अडचणींचा पाढा वाचत विद्यार्थ्यांनी आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्यासमोर राज्य सरकारविरोधात (Maharashtra Government) आक्रोश केला. यावेळी या प्रश्नांना सरकार दरबारी वाचा फोडण्याचे आश्वासन देत पवार यांनी विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरणार असल्याचेही जाहीर केले. शिक्षक भरतीचा जीआर येत्या बारा दिवसात निघाला नाही तर मंत्रालयासमोर उपोषणाला  बसणार, असा अल्टिमेटमही पवार यांनी सरकारला दिला आहे.

पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांनी रोहित पवारांशी संवाद सादत आपल्या समस्या मांडल्या. चर्चासत्रात पेपरफुटीच्या प्रश्नावर विद्यार्थ्यांना उत्तर देताना आणि ‘एज्युवार्ता’शी संवाद साधताना पवार यांनी सांगितले की, पेपरफुटीच्या संदर्भात उत्तराखंडमध्ये जसा कायदा आहे, तसा कायदा महाराष्ट्रात आणण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. तोपर्यंत परीक्षा केंद्रावर तहसिलदारांची पथके, पोलिसांची पथके तसेच जॅमर यांसारख्या गोष्टी लावल्या जाव्यात, यासाठी आम्ही पाठपुरावा करू, असेही ते म्हणाले.

Talathi Bharti : पेपर डाऊनलोड करण्यासाठी लॅपटॉप थेट परीक्षा केंद्राबाहेर, विद्यार्थ्यांकडून आक्षेप

सरळसेवा भरतीसाठी आकारले जाणारे शुल्क विद्यार्थ्यांच्या खिशाला परवडणारे नाही, असा मुद्दा विद्यार्थ्यांनी मांडला असता पवार यांनी सरकारला सुनावले. महाराष्ट्रातील सरकाराने विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना गृहित धरले जात नाही, त्यामुळे हे होत आहे, असा खोचक टोला त्यांनी यावेळी सरकारला लगावला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे निकाल उशीर लागणे, परीक्षा ऑनलाईन घेणे यांसारख्या स्पर्धा परीक्षांच्या अनेक पश्नांवर पवार यांनी विद्यार्थ्यांशी या चर्चासत्रात चर्चा केली. यानंतर पवार यांनी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न मांडावे आणि तसे वातावरण तयार करावे, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रश्नांसाठी आंदोलन केले, तरी आपला त्याचा पाठिंबा असेल, असे आश्वासनही त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo