लालपरीची नवी मोहिम; विद्यार्थ्यांना आता शाळेतच मिळणार 'एसटी पास' 

राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयात एसटीचे विद्यार्थी प्रवाशी मासिक पास वितरित केले जाणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी दिली.

लालपरीची नवी मोहिम;  विद्यार्थ्यांना आता शाळेतच मिळणार 'एसटी पास' 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शाळा आणि महाविद्यालयात विद्यार्थी-विद्यार्थिनींना आता एसटीचा पास थेट त्यांच्या शाळेमध्येच (ST pass directly in school) उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी बस स्थानकात रांगेत उभे राहण्याची आवश्यकता भासणार नाही. राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयात एसटीचे विद्यार्थी प्रवाशी मासिक पास वितरित केले जाणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर (Managing Director Dr. Madhav Kusekar) यांनी दिली. तसेच स्थानिक एसटी प्रशासनाला या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

एसटी महामंडळातर्फे मंगळवार दि. १८ जूनपासून 'एसटी पास थेट तुमच्या शाळेत' ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना जवळील एसटीच्या आगार व्यवस्थापकांना पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी द्यावी लागणार आहे. एसटीच्या या योजनेचा राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. 

ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थी एसटीने रोज प्रवास करतात. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या सत्रातील शाळा दोन दिवसांपुर्वीच सुरू झाल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी सरकारने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून ६६ टक्के इतकी सवलत दिली आहे. याचा थेट फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यामुळे त्यांना केवळ ३३ टक्के रक्कम भरून मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जातात. 

पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांना बसस्थानकात, एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभे राहून पास काढावा लागतो. मात्र,  यंदापासून विद्यार्थ्यांना पाससाठी आता रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा, महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्याकडून त्या विद्यार्थ्यांना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत.