NEP मध्ये खासगी क्लासला विरोध असताना पुणे महापालिकेकडून प्रोत्साहन, विद्यार्थ्यांना मिळणार अर्थसहाय्य

शैक्षणिक धोरण आणि पुणे महानगरपालिकेची योजना यात विरोधाभास असल्याचे दिसून येत आहे.

NEP मध्ये खासगी क्लासला विरोध असताना  पुणे महापालिकेकडून प्रोत्साहन, विद्यार्थ्यांना मिळणार अर्थसहाय्य
PMC

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

एकीकडे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (NEP 2020) खाजगी कोचिंग क्लासला (Private Coaching Class) विरोध दर्शविण्यात आला आहे. बोकाळलेल्या कोचिंग क्लास संस्कृतीमुळे विद्यार्थ्यांची हानी होत असल्याचे 'एनईपी'मध्ये नमूद करण्यात आले आहे. असे असताना पुणे महानगरपालिकेच्या (PMC) समाज विकास विभागाकडून मात्र दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना (Students) खाजगी कोचिंग क्लाससाठी अर्थसहाय्य देण्याची योजना राबवली जात आहे. परंतु, यामुळे शैक्षणिक धोरण आणि पुणे महानगरपालिकेची योजना यात विरोधाभास असल्याचे दिसून येत आहे.

पुणे महानगरपालिकेने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी खाजगी क्लास अर्थसहाय्य योजना, इयत्ता बारावीतील विद्यार्थ्यांसाठी खाजगी क्लास अर्थसहाय्य योजना, सीईटी परीक्षेस बसण्यासाठी अर्थसहाय्य, उच्च व्यावसायिक तंत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य या  योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत इच्छुक विद्यार्थ्यांना dbt.punecorporation.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. या योजनेमुळे काही विद्यार्थ्यांना लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, शाळा, महाविद्यालयातील शिक्षणावर अविश्वास दाखवून खाजगी क्लासला प्रोत्साहन देणे योग्य नाही, अशा प्रतिक्रिया तज्ञांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

विद्यार्थ्यांनो, लवकरच उघडणार ‘जादुई पिटारा’; खेळांच्या माध्यमातून घ्या शिकण्याचा आनंद

मुख्याध्यापक महासंघाचे प्रवक्ता महेंद्र गणपुले म्हणाले, खाजगी क्लास साठी विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य देणे उचित नाही. अशा पद्धतीची योजना राबवून शाळा-महाविद्यालयांवर अविश्वास दाखवल्यासारखे होते. तसेच खाजगी क्लासेस चालकांना नवीन मूल्यमापन पद्धतीची माहिती असतेच असे नाही. यापूर्वी अनेकदा शाळांमधील शिक्षण इतके प्रभावी करा की खाजगी कोचिंग क्लासची आवश्यकता राहणार नाही, असे अनेक वेळा शालेय शिक्षण मंत्र्यांनी बोलून दाखवले आहे.

खासगी क्लासला प्रोत्साहन चुकीचे

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कोचिंग संस्कृती संपुष्टात यावी, असे म्हटले आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे खासगी कोचिंग क्लासला प्रोत्साहन देणे उचित नाही.

- डॉ.वसंत काळपांडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

...तर ही योजना आपोआपच बंद पडेल

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना खाजगी कोचिंग लावण्याची आवश्यकता भासणार नाही, असे बदल नवीन शैक्षणिक धोरणात केले जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसे झाल्यास आपोआपच या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होईल आणि ही योजना बंद पडेल.

- नितीन उदास, उप आयुक्त, समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका

खासगी क्लासेसचे घर भरण्याचा प्रकार

पुणे महानगरपालिकेची योजना म्हणजे खासगी क्लासेसचे घर भरण्याचा प्रकार आहे. विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयांमध्येच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी  पालिकेने निधी खर्च करायला हवा. त्यामुळे पालिकेने या योजनेचा पुनर्विचार करावा.

- दिलीपसिंग विश्वकर्मा, महा पेरेंट्स असोसिएशन

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD