मुंबई विद्यापीठ: पदवी प्रवेशाची तिसरी प्रवेश यादी प्रसिद्ध; 4 जुलैपासून वर्ग सुरू 

तिसऱ्या प्रवेश फेरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांचे वर्ग ४ जुलैपासून सुरू होणार आहेत, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. 

मुंबई विद्यापीठ: पदवी प्रवेशाची तिसरी प्रवेश यादी प्रसिद्ध; 4 जुलैपासून वर्ग सुरू 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मुंबई विद्यापीठाशी (Mumbai University) संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये पदवीच्या ३ आणि ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची तिसरी प्रवेश यादी जाहीर (Third admission list announced) करण्यात आली आहे. तिसऱ्या प्रवेश फेरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांचे (First Year Degree Course) वर्ग ४ जुलैपासून सुरू होणार आहेत, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. 

यंदा  २ लाख ५० हजार ४५३ विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणी केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी ८ लाख ७० हजार ५९५ एवढे अर्ज सादर केले आहेत. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अर्जामध्ये बी.कॉम. अभ्यासक्रमासाठी सर्वाधिक १ लाख ८८ हजार ३९० अर्ज आले आहेत. तसेच, पदवी अभ्यासक्रमांसाठीच्या पहिल्या प्रवेश यादीनुसार स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये (कट ऑफ) वाढ झाली आहे. तर पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये किंचितशी घट दिसत आहे. 

दुसऱ्या प्रवेश यादीनुसार पहिल्या प्रवेश यादीच्या तुलनेत प्रवेश पात्रता गुणांमध्ये ३ ते ४ टक्क्यांची घट झाली होती. त्यामुळे, तिसऱ्या प्रवेश यादीतील प्रवेश पात्रता गुणांवर कितपत होतो आहे, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या संबंधित संकेतस्थळा वरून तिसरी प्रवेश यादी पाहता येईल. त्यानुसार २९ जून ते ३ जुलै, दुपारी ३ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करायचा आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न अनेक नामांकित महाविद्यांलयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. 

मुंबई विद्यापीठ गुणवत्ता यादी अशी तपासा.. 

प्रथम मुंबई विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ mu.ac.in ला भेट द्या. मुख्यपृष्ठावरील सूचनेकडे स्क्रोल करा. गुणवत्ता यादी चिन्ह निवडा आणि संबंधित अभ्यासक्रम निवडा. संबंधित अभ्यासक्रम निवडा आणि लिंकवर क्लिक करा. गुणवत्ता यादी डाउनलोड करा आणि भविष्यातील वापरासाठी जतन करा