शिष्यवृत्ती निकालात या जिल्ह्यांची बाजी; टॉप टेनमध्ये तुमचा जिल्हा आहे का?

इयत्ता पाचवीच्या निकालात कोल्हापूर जिल्हा टॉपवर असून सर्वाधिक जवळपास ४० टक्के तर मुंबई उत्तरमधील सर्वाधिक ३२ टक्के विद्यार्थी इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.

शिष्यवृत्ती निकालात या जिल्ह्यांची बाजी; टॉप टेनमध्ये तुमचा जिल्हा आहे का?
Scholarship Examination Result

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत (MSCE) घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेच्या (5th 8th standard scholarship result) अंतरिम निकालात कोल्हापूर (kolhapur) आणि मुंबई (Mumbai) विभागाने बाजी मारली आहे. इयत्ता पाचवीच्या निकालात कोल्हापूर जिल्हा टॉपवर असून सर्वाधिक जवळपास ४० टक्के तर मुंबई उत्तरमधील सर्वाधिक ३२ टक्के विद्यार्थी इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.

शिष्यवृत्तीचा निकाल शनिवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला आहे. पाचवीचे १ लाख १३ हजार ९३८  विद्यार्थी आणि आठवीचे ५५ हजार ५५७  विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. परिषदेमार्फत ही शिष्यवृत्ती परीक्षा १२ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती. इयत्ता पाचवीच्या परीक्षेसाठी ५ लाख ३२ हजार ८५७ विद्यार्थ्यांनी तर आठवीच्या परीक्षेसाठी ३ लाख ६७ हजार ७९६ अशा एकूण ९ लाख ६५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

हेही वाचा : मोठी बातमी : पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

इयत्ता पाचवीच्या निकालात कोल्हापूर, बुलडाणा, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, मुंबई उत्तर, अहमदनगर व जालना हे जिल्हा टॉप टेनमध्ये आहेत. गडचिरोली जिल्हा तळाला असून या जिल्ह्यातील केवळ ६.९६ टक्के विद्यार्थी पात्र ठरले आहेत. परीक्षा दिलेल्या ४ हजार ८०० पैकी केवळ ३३४ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.

इयत्ता आठवीच्या परीक्षेतही गडचिरोली जिल्हा तळात आहे. दोन हजार ७६४ विद्यार्थ्यांपैकी केवळ १४१ विद्यार्थी पात्र ठरले असून याची टक्केवारी ५.१० एवढी आहे. टॉप टेनमध्ये मुंबई उत्तर आघाडीवर असून निकाल ३१.८० टक्के एवढा आहे. त्यापाठोपाठ दक्षिण पश्चिम, कोल्हापूर, मुंबई दक्षिण, मुंबई (बीएमसी), पुणे, ठाणे, बुलडाणा, धुळे व सातारा या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.

 

इयत्ता पाचवी व आठवीचा जिल्हानिहाय निकालातील टॉप टेन जिल्हे (टक्के)

       जिल्हा              इयत्ता पाचवी         

  1. कोल्हापूर       ३९.९३              
  2. बुलडाणा       ३६.६४              
  3. सातारा          ३१.१७                      
  4. पुणे               २९.५८              
  5. रत्नागिरी         २९.३९              
  6. सिंधुदुर्ग         २८.९७              
  7. सांगली          २६.२०              
  8. मुंबई उत्तर      २६.१८              
  9. अहमदनगर   २६.००              
  10. जालना        २४.४४              

--------------------------

      जिल्हा               इयत्ता आठवी

  1. मुंबई उत्तर         ३१.८०
  2. दक्षिण पश्चिम      ३०.१०
  3. कोल्हापूर          २९.२६
  4. मुंबई दक्षिण        २७.०६
  5. मुंबई (बीएमसी)     २३.५३
  6. पुणे                   २२.८५
  7. ठाणे                 २२.७७
  8. बुलडाणा           २२.२१
  9. धुळे                  २२.१०
  10. सातारा              २१.७६