कुलसचिव, अधिष्ठातांच्या नियुक्तीचा प्रस्ताव शासनाकडे धुळखात; बकोरियाही हतबल

पुण्यातील बालेवाडी येथे क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा तीन वर्षांपुर्वी करण्यात आली होती. या विद्यापीठातून क्रीडा क्षेत्राशी संबंधित विविध अभ्यासक्रमही सुरू केले जाणार होते.

कुलसचिव, अधिष्ठातांच्या नियुक्तीचा प्रस्ताव शासनाकडे धुळखात; बकोरियाही हतबल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ (International Sports University) असा गाजावाजा राज्य सरकारकडून (Maharashtra Government) करण्यात आला. पण याच राज्य सरकारने विद्यापीठ सुरू करण्याकडे अक्षम दर्लक्ष केले आहे. विद्यापीठ चालविण्यासाठी आवश्यक विविध अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचा प्रस्ताव सरकारकडे धुळखात पडून असल्याचे समोर आले आहे. या विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू (Vice Chancellor) व समाजकल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया (Om Prakash Bakoria) यांनी नियुक्त्यांचा प्रस्ताव शासनाकडे दिल्याची माहिती दिली.

 

पुण्यातील बालेवाडी येथे क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा तीन वर्षांपुर्वी करण्यात आली होती. या विद्यापीठातून क्रीडा क्षेत्राशी संबंधित विविध अभ्यासक्रमही सुरू केले जाणार होते. टप्प्याटप्प्याने त्यामध्ये वाढ करण्याचे नियोजित होते. तत्कालीन क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे त्यावेळी प्रभारी कुलगुरूपद देण्यात आले. त्यानंतर काही दिवसांत त्यांची पुणे महानगर परिवहन महामंडळात बदली झाली. तिथून त्यांची बदली करून समाजकल्याण आयुक्तपदाचा पदभार सोपविण्यात आला.

विद्यापीठाचा जलतरण तलाव घोषणे पुरताच; सत्ताधा-यांना आश्वासनांचा विसर

 

सध्या राज्याचे क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे आहे. पण असे असले तरी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा भार बकोरिया यांच्यावरच आहे. कुलगुरूपद आपल्याकडेच असल्याचे सांगत बकोरिया म्हणाले, अद्याप काहीच सुरू झालेले नाही. अधिष्ठाता, कुलसचिव यांसह इतर महत्वाची पदांवर नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे. ही पदे लवकर भरावीत अशी विनंती केली आहे. त्यानंतरच इतर आवश्यक पदांची कंत्राटी व पुर्णवेळ पदे भरायची आहेत. ही पदे भरल्याशिवाय अभ्यासक्रम सुरू करता येणार नाहीत. हे शैक्षणिक वर्ष तर आता सुरू होणार नाही. पण पुढील शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न राहील.

 

बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. त्यासाठी स्वतंत्र इमारत नसली तरी तेथील एका इमारतीतच तात्पुरते विद्यापीठ थाटण्यात आले आहे. विद्यापीठातून शारीरिक व क्रीडा शिक्षण, क्रीडा विज्ञान व क्रीडा वैद्यक, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा माध्यमे व संज्ञापन, क्रीडा शिकवणी व प्रशिक्षण या विषयांचे अभ्यासक्रम घेण्याचे नियोजन आहे.

 

मात्र, अद्याप विद्यापीठाला पुर्णवेळ कुलगुरूंसह कुलसचिव, अधिष्ठाता, परीक्षा नियंत्रक, वित्त अधिकारी आदी प्रशासकीय पदे मिळालेली नाहीत. प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्याही झालेल्या नाहीत. बकोरिया यांच्याकडून सुरूवातीपासून सातत्याने पत्रव्यवहार करण्यात आला. पण नियुक्त्यांकडे शासनाने कानाडोळा केल्याने विद्यापीठ केवळ कागदावरच उरले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j