खेळांचे उन्हाळी शिबीर घडवू शकतात मुलांचे भवितव्य 

खेळांची उन्हाळी शिबिरे मुलांच्या दृष्टीने खूप महत्वाची असतात. हा काळ विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फार महत्वाचा असतो. अशा शिबिरांमध्ये भाग घेतल्यामुळे मुलांचा कल, त्यांना कोणत्या खेळाची आवड आहे, हे लक्षात येऊ शकते.

खेळांचे उन्हाळी शिबीर घडवू शकतात मुलांचे भवितव्य 
Summer Vacation

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

खेलोगे, कूदोगे हो जाओगे खराब... ही म्हण आता मागे पडली असून पालकांनी आपल्या पाल्यांच्या फिजिकल फिटनेस (Physical Fitness) आणि मैदानी खेळांचे (Sport) महत्व ओळखले आहे. त्यामुळेच आता पालक (Parents) मुलांना खेळांच्या शिबिरांना पाठवतात. मागील काही वर्षांपासून खेळांच्या उन्हाळी शिबिरांचेही (Summer Vacation) महत्व वाढले आहे.

खेळांची उन्हाळी शिबिरे मुलांच्या दृष्टीने खूप महत्वाची असतात. हा काळ विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फार महत्वाचा असतो. अशा शिबिरांमध्ये भाग घेतल्यामुळे मुलांचा कल, त्यांना कोणत्या खेळाची आवड आहे, हे लक्षात येऊ शकते. तसेच उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मुले अभ्यास, शाळा, शिकवणी यामध्ये गुंतलेली नसतात. त्यामुळे खेळाचा सराव झाल्यानंतर मुलांना व्यवस्थित शारीरिक अराम मिळू शकतो, त्यामुळे या शिबिरांमध्ये मुलांनी सहभागी होणे, महत्वाचे आहे, असे मत मैदानी खेळांचे तज्ज्ञ आणि प्रशिक्षक गुलजार (Guljar) यांनी 'एज्युवार्ता'शी बोलताना व्यक्त केले.  

हेही वाचा : मुलांनो, उन्हाळी सुट्टी अशी लावा सार्थकी..डॉ. शकुंतला काळे यांनी सांगितल्या या महत्वाच्या टिप्स!

गुलजार म्हणाले, "सध्या क्रिकेट या खेळाला असलेले वलय आणि आकर्षण यामुळे बऱ्याच पालकांना आणि त्यांच्या पाल्याना क्रिकेटचे प्रशिक्षण घ्यायचे असते. पण आपला पाल्य त्या खेळासाठी फिट आहे का, त्याचा कल खरोखर त्या खेळाकडे आहे का याचा कुणी विचार करत नाही. गंमतीची बाब म्हणजे आता काही पालक त्यांच्या पाल्याना शिबिरात आणतानाच आमचा मुलगा IPL खेळेल का असे विचारतात. ही बाब गमतीशीर वाटत असली तरी खूप गंभीर आहे."

"आपल्याकडे ४८ खेळ आहेत. क्रिकेट वगळता इतर ४७ खेळांकडे पालक दुर्लक्ष करतात. वास्तविक पाहता या खेळांमध्येही मुलांना चांगले भवितव्य आहे. फुटबॉल, बास्केटबॉल, रग्बी, टेनिस, कबड्डी, खोखो, थ्रो बॉल असे अनेक खेळ आहेत, ज्यामध्ये मुले आपले करिअर घडवू शकतात. या खेळांमध्ये चांगला परफॉर्मन्स करून मुलांना भविष्यात सरकारी नोकऱ्याही मिळू शकतील, पण ही बाब पालकांच्या लक्षात येत नाही," असे गुलजार यांनी नमूद केले.

"मुलांनी सांघिक खेळ खेळण्यापेक्षा वयक्तिक खेळाला जास्त महत्व द्यावे, रायफल शूटिंग, आर्चरी, टेनिस, गोळा फेक अशा खेळांमध्ये मुलांचा इंडिविज्युअल परफॉर्मन्स लक्षात येतो. त्यामुळे त्यांना भविष्यात चांगली संधी मिळू शकतात," असा सल्लाही गुलजार यांनी दिला.